सोलापूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील अन्नपदार्थांची भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाची नजर राहणार असल्याची माहिती सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली.
दिवाळी सण तोंडावर आल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. या निमित्ताने अन्नपदार्थ खरेदीची मोठी उलाढाल होते. खाद्यतेल, बेसन, रवा, गूळ, डाळींना मोठी मागणी असते. त्यामुळे या काळात बऱ्याच पदार्थांमुळे भेसळ होण्याची शक्यता असते. भेसळ करणाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचा परवाना न घेतलेल्या सर्व उत्पादकांवर नजर ठेवण्यात येत आहे. भेसळयुक्त मसाले, फराळ बनविण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे फराळासाठी अन्नपदार्थांची खरेदी करताना नागरिकांनीही दक्ष रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.