आप्पासाहेब पाटील, सोलापूर : पंढरपुरातील आषाढी वारीसाठी आज बुधवार २१ जून २०२३ रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. या पाण्यामुळे वारीसाठी आलेल्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. पंढरपुरात आलेल्या प्रत्येक भाविकांना आवश्यक त्या सेवासुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
उजनी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजल्यापासून पंधराशे क्युसेकने पाणी सोडले आहे. दुपारनंतर यात वाढ होणार असून जवळपास साडेचार हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. पंढरपुरात पाणी पोहोचल्यानंतर मात्र विसर्ग कमी केला जाणार आहे. आषाढी वारीपर्यंत म्हणजेच २९ जूनपर्यंत हे पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे वारीसाठी आलेल्या भाविकांची व नदीकाठच्या लोकांची सोय होणार आहे. सध्या उजनी धरणात वजा ३० टक्के पाणीसाठा आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महसूल, जिल्हा परिषद, पेालिस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील विविध विभागाचे मंत्री पंढरपुरात येऊन तयारीचा आढावा घेत आहेत. शिवाय मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीही पंढरपुरात तळ ठोकून आहेत.