सोलापूर : पुण्यातील शाळेत विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. शाळांमध्येसीसीटीव्हीमुळे मुलींची सुरक्षितता ठेवण्यास मदत होते. यामुळे खासगी व सरकारी अशा प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
शिक्षण विभागाने खासगी व्यवस्थापनातील शाळांना सीसीटीव्ही लावण्याचे आदेश काही वर्षांपूर्वी दिले होते. मात्र, अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता पुण्यातील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी लक्ष केंद्रित केले असून, सरकारी आणि खासगी शाळांमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा आदेश जारी केला आहे.
मोजक्याच शाळांत सीसीटीव्ही
जिल्ह्यातील काही मोजक्याच आणि शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील इंग्रजी खासगी शाळांमध्येही सीसीटीव्ही नसल्याची स्थिती आहे. शिक्षण विभागाकडून सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचा पाठपुरावाही सुरू आहे.
शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. एवढ्यावरच न थांबता सीसीटीव्ही बसवून ते कार्यरत राहण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.
- भास्करराव बाबर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
-----
सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. शासनाच्या आदेशाचे सर्वांनीच स्वागत करायला हवे. या निर्णयाचे सर्वच शाळांनी पालन करणे गरजेचे आहे.
- सुधीर गायकवाड, पालक
कुठलीही वाईट कृती करताना कुणीतरी आपल्याला पाहतंय, हे जाणवल्यास अशा कृती करणाऱ्यांवर वचक राहतो. त्यामुळे सीसीटीव्ही हे फक्त मुलीच नव्हे तर सर्वांच्याच सुरक्षेसाठी गरजेचे आहे.
- अनुराधा पवार, पालक
----------
- जिल्ह्यातील शाळा - ४,६८४
- जिल्हा परिषदेच्या शाळा - २,७९८
- विनाअनुदानित शाळा - १५०
- अनुदानित शाळा - १०४३
- शहरातील शाळा - ३९०
---------------------------------------------------