आप्पासाहेब पाटील
सोलापूर : थकीत मालमत्ताकरांची वसुली मोहीम सोलापूर महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाकडून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तीन लाखांपुढील थकबाकी असलेल्या मिळकतदारांना नोटिसा बजावण्यास प्रारंभ झाला आहे. तीन लाखांपुढील थकबाकी असलेले एकूण १९ हजार मिळकतदार असून त्यापैकी ११ हजार मिळकतदारांना आतापर्यंत जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली.
मागील महिन्यात महापालिका प्रशासनाच्या वतीने कारवाईची धडक मोहीम राबवली होती. तत्पूर्वी मिळकत कर शासकीयमध्ये ८० टक्के सवलती योजना जाहीर केली होती, त्यानंतर याचा अनेकांनी फायदा घेतला. साधारणता नऊ कोटी रुपये सवलत देण्यात आली, सुमारे ४० कोटी रुपये यादरम्यान मिळकत कर वसुली झाली होती. बडा थकबाकीदारांच्या आस्थापनांना सील ठोकण्यात आले होते यामध्ये शैक्षणिक संस्थांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती दरम्यान आता बुधवारपासून पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाने शहरातील बडे थकबाकीदार असलेल्या व्यावसायिक आस्थापनांना रडारवर घेतले आहे.
विशेष म्हणजे कुणालाही मिळकत करामध्ये सवलत मिळणार नाही. १०० टक्के मिळकत कर भरावाच लागणार आहे. कटू कारवाई टाळण्यासाठी संबंधित थकबाकीदारांनी मिळकत कर भरून महापालिका प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन कर संकलन विभागाने केले आहे.
चेक बाऊन्स झाल्याने कारखाना केला सील
दोन दिवसापासून सुरू करण्यात आलेल्या कारवाईमुळे कर संकलन विभागाने दोन दिवसात २३ मिळकतदारांकडून थकबाकीपोटी १५ लाख ४४ हजार ९८६ रूपये वसूल केले आहेत. शिवाय सुजाता दामोधर आडम, गांधीनगर यांनी २ लाख ६२ हजार ६७५ रूपयांचा चेक दिला होता. मात्र तो चेक बाउन्स झाल्याने कारखाना सील केला आहे.
मिळकत कर थकबाकी दारांवर पुन्हा जप्तीची मोहीम महापालिका कर संकलन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. मोठी थकबाकी असलेल्या व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे आहे. - विद्या पोळ, उपायुक्त, सोलापूर महानगरपालिका.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"