राकेश कदम
सोलापूर : इथे आमची राहायची, जेवणाची व्यवस्था आहे. औषधं, गोळ्यासुध्दा मिळतात. पण घर ते घर आहे शेवटी. आम्हाला घरी जायचंय, असं परप्रांतांतील अनेक मुली सांगताहेत.
लातूरमधील एका इन्स्टिट्यूूटमध्ये विजयपूर, हुबळी, धारवाड येथील मुली विविध कंपन्यांच्या मार्केटिंगचे प्रशिक्षण घेतात. लातूरमध्ये विविध ठिकाणी भाड्याने खोल्या घेऊन राहतात. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घरमालकांनी या रुम रिकाम्या करायला सांगितल्या. एका खासगी वाहनाने सर्व मुली सोलापूरमार्गे विजयपूरकडे निघाल्या होत्या. सोलापुरात त्यांची बस अडवून त्यांना नूतन विद्यालयातील निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. या ठिकाणी केरळ, तामिळनाडू येथील मुले होती. मुले व मुली एकत्र नको म्हणून महापालिकेने मुलींसाठी अंत्रोळीकरनगर येथील पुष्पस्नेह मंगल कार्यालयातील निवारा केंद्र सुरू केले. इतर निवारा केंद्रांच्या तुलनेत हे एक चांगले निवारा केंद्र आहे.
हुबळी येथील रमिझा नवर, नगिना शेख, पवित्रा नवर म्हणाल्या, आम्हाला सुरुवातीला सोलापुरात आणले तेव्हा आमची इथे राहायची इच्छा नव्हती. एकेदिवशी एक मॅडम आल्या. बाहेर पडलात तर तुम्हाला कोरोनाची बाधा होईल. तुमच्या गावाचे रस्ते बंद आहेत. तुम्हाला कुठेतरी अडकून पडावे लागेल, असे सांगितले. त्यामुळे आम्ही इथे राहायचा निर्णय घेतला. घरची आठवण तर येते. व्हिडीओ कॉल करुन या ठिकाणी कसे वातावरण आहे हे घरच्यांना दाखवतो. दिवसभर बसून तर काय करायचे. कधी एकदा लॉकडाऊन संपेल याची वाट पाहतोय.
विरंगुळा देण्याचा मनपा कर्मचाºयांचा प्रयत्न- महापालिकेतील शेफाली दिलपाक, सुचेता आमणगी या निवारा केंद्रातील मुलींची व्यवस्था पाहतात. पुष्पस्रेहच्या लॉनवर सायंकाळी फुटबॉल, बॅडमिंटनसह वातावरण हलके-फुलके करण्यासाठी खेळ रंगलेले असतात. घरापासून दूर असलेल्या या परप्रांतातील मुलींना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करीत असतात.
अनुकंपा नोकरीसाठी आल्या, २५ दिवस सोलापुरातच अडकून पडल्या
- - अनुकंपावरील नोकरीचा कायदेशीर सल्ला घेण्यासाठी मुंबईच्या नेहा कोंतम २० मार्च रोजी सोलापुरात आल्या होत्या. दुसºया दिवशी मुंबईला परतणार होत्या. तत्पूर्वी जनता कर्फ्यु जाहीर झाला. मुंबईकडे जाणारी वाहने बंद झाली. पतीने मुंबईतून खासगी वाहन पाठवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परवानगी दिली नाही.
- - काही दिवस नातेवाईकांकडे राहिल्या. तिथे इतरांना त्रास नको म्हणून आता निवारा केंद्रात आल्या आहेत. गेले २५ दिवस मी सोलापुरात आहे. माझं घर, संसार सगळं मुंबईत आहे. उदगीरला सासर आहे. कुठेतरी जायची मला परवानगी द्या, असं आर्जव त्या करीत आहेत.