मोडनिंब : ‘मेरा पती मेरे गाव में बहुत बिमार है, उसको चलने नही आता, हात से कुछ खाने नही आता, इसलिये हमे यहा से छोड दो’ अशी आर्त हाक मोडनिंबच्या शेल्टर होममधील तेलंगणा येथील अनिता खतरावत या महिलेने डोळ्यात पाणी आणून दिली़ याशिवाय आमच्या गावी लवकर सोडा म्हणत अनेक परप्रांतीयांनी अन्नत्यागही केला आहे.
६३ परप्रांतीय मोडनिंब येथील श्रीमंत सौ़ उमाबाई स्मारक शिक्षण संस्थेच्या इमारतींमध्ये गेल्या महिनाभरापासून थांबलेले आहेत़ हे सर्वजण कोणी मोटरसायकलवरून तर कोणी पायी चालत कर्नाटक व तेलंगणाकडे निघाले होते़ तेव्हा टेंभुर्णी पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन मोडनिंब येथील शेल्टर होममध्ये आणून सोडले होते़ या सर्वांना ३ मे रोजी आपली सुटका होईल, असे वाटत होते़ पण अद्याप तरी त्यांना सोडण्यात आले नाही़ त्यामुळे हे सर्वजण नाराज असून, आम्हाला कधी सोडणार याची सर्वांना काळजी आहे.
या ठिकाणी महिला व लहान मुलांची संख्या जास्त आहे़ माढा तालुक्यातील मोडनिंब, टेंभुर्णी, बैरागवाडी, कुर्डूवाडी,माढा या सर्व ठिकाणी १८० परप्रांतीय राहत असून, त्यांच्या राज्याने अथवा जिल्हाधिकाºयांनी त्यांना आमच्याकडे पाठवा असा अद्याप तरी संदेश आला नाही़ त्यामुळे आपण आपल्या गावाकडे जायचं कसं हा प्रश्न सर्वांपुढे उभा आहे.
माढा तालुक्यातील या सेल्टर होममध्ये आंध्रप्रदेश, दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा यासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील नागरिक आहेत़ ५ मे रोजी मोडनिंब येथील शेल्टर होममध्ये राहणाºया तेलंगणा व कर्नाटक येथील नागरिकांनी आमची जायची आताच व्यवस्था करा अथवा आम्ही अन्नत्याग करू, असा इशारा दिला आणि सर्वजण दुपारी ४ वाजेपर्यंत जेवण केले नाही़ अखेर सरपंच दत्तात्रय सुर्वे व कुमार वाघमारे यांनी या सर्वांना हात जोडून विनंती केली़ शिवाय तुम्हाला लवकरात लवकर सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
वरिष्ठांकडून आदेश येईना : तहसीलदार- याबाबत तहसीलदार राजेश चव्हाण यांना या शेल्टर होममधील परप्रांतीयांबाबत विचारले असता म्हणाले, माढा तालुक्यातील सर्व सेल्टर होममधील नागरिकांची तपासणी वैद्यकीय अधिकाºयांकडून केली आहे़ त्यांची सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास आॅनलाइन पाठवली आहे़ सध्या कर्नाटक व तेलंगणा ही दोन्ही राज्ये महाराष्ट्रात असणाºया सर्व मजुरांना आपल्या राज्यात घ्यायला तयार नाहीत़ त्यामुळे त्यांना सोडण्याचे आदेश वरिष्ठांकडूनच आले नाहीत, असे त्यांनी सांगितले़
४ मे रोजी माझी आजी तेलंगणा येथे मयत झाली़ मात्र जाता आले नाही़ माझ्यासह अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ पण कुणाला काय सांगायचे? काहीही करून आम्हाला सोडण्याची व्यवस्था करावी़- रवी वडत्या,नागरिक, तेलंगणा