सोलापूर : वटपौर्णिमेनंतर आलेल्या ‘कर’ची शिकार वनविभागाने हाणून पाडत २३ जणांना पकडले़ मात्र या शिकाºयांनी कोन्हाळीत १५ ससे आणि वागदरी सीमेवर १३ ससे मारले़ हे ससे वनविभागाने ताब्यात घेत त्या २३ जणांना अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात आणून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू ठेवली होती़ मात्र कारवाईत कोन्हाळीतील शिकारी हाती लागू शकले नाहीत़ वनअधिकाºयांना पाहताच पळून जाण्यात ते यशस्वी ठरले़
वटपौर्णिमेनंतर आलेल्या करनिमित्त वागदरी (ता़ अक्कलकोट) येथील काही युवकांच्या टोळीने शिकार करण्याचा बेत आखला़ दुपारी ही टोळी कोन्हाळीत जाऊन १५ ससे मारले़ काही लोकांनी ही बाब वनविभागाला टोल फ्रीवरून सांगितली़ मुंबई कार्यालयातून सोलापूर वनविभागाला दूरध्वनी आला आणि उपवनसंरक्षक संजय माळी यांनी तत्काळ सूत्रे हलवली़
दरम्यान, एक टोळी कोन्हाळीत शिकार करून परतत असताना त्यांच्या नजरेस वनविभागाचे पथक पडले़ त्यांनी सोबत आणलेल्या एका १० वर्षांच्या मुलाला सोबत आणलेले जाळे तेथेच सोडून पळ काढला़ या शिकाºयांच्या मागावर वनविभागाचे पथक असताना वागदरीतील काहीजन कर्नाटक हद्दीत वागदरी-गुलबर्गा मार्गावर सशांची शिकार करून दुसरी एक टोळी निघाल्याची माहिती मिळाली़ दरम्यान, या पथकाने पुन्हा सापळा लावला आणि दुसºयाच एका टोळीला रंगेहाथ पकडून त्यांच्याजवळील १३ मृत ससे हस्तगत केले़ तसेच आठ पाळीव कुत्रे, जाळे यांच्यासह २३ शिकाºयांना ताब्यात घेतले़
रात्री उशिरापर्यंत कारवाई- वागदरी-गुलबर्गा रोडवर रंगेहाथ पकडलेल्या शिकाºयांना वनविभागाच्या अधिकाºयांनी चौकशीकरिता आणि कारवाईकरिता अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात आणले़ त्यांच्यासोबत ताब्यात घेतलेल्या ट्रॅक्टर, जाळे, लाकडी दंडुके आणि पाळीव कुत्रे देखील पोलीस ठाण्याच्या आवारात आणून बांधले होते़ रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू होती.