मंगळवेढा तालुक्याचे एकूण क्षेत्र १ लाख १४ हजार १६१ हेक्टर आहे. यामध्ये १ लाख ६ हजार १८१ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. यामध्ये खरीप लागवडीयोग्य सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार २७२ हेक्टर असून, फळबाग क्षेत्र ६ हजार ५२० हेक्टर, रबीचे सरासरी क्षेत्र ५८ हजार ७१७ हेक्टर आहे. सुमारे ६० टक्के भाग माळरान असल्याने या भागातील शेतजमीन हलकी व मुरमाड आहे. मागील दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने खरिपाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील खरीप हंगामात प्रामुख्याने तूर, मूग, उडीद, बाजरी, मका ही नगदी पिके घेतली जातात. त्याचप्रमाणे सूर्यफूल व इतर गळीत धान्याची पिके घेतली जातात. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या नियोजनानुसार यावर्षी प्रस्तावित केलेल्या पीकनिहाय क्षेत्राप्रमाणे तूर, मूग, उडीद, कांदा अशी ३० हजार २७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याची माहिती मंडल कृषी अधिकारी राजकुमार ढेपे यांनी दिली.
कोरोनाने ग्रामीण अर्थचक्र बिघडले
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा खरिपाच्या तयारीला लागला आहे. मात्र, कोरोनाने ग्रामीण भागातील अर्थचक्र बिघडले असून, बियाणांसाठी, भांडवलासाठी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कोट ::::::::::::::::::
तालुक्यात बाजरी, मका, मूग, भुईमूग, तूर, उडदाची पेरणी, कांदा पिकाची लागवड खरीप हंगामात होणे अपेक्षित आहे. या विविध पिकांचे उत्पादन वाढीसाठी बीजप्रक्रिया, पेरणी, रासायनिक खताची बचत करणे, जमीन आरोग्य पत्रिकेप्रमाणे खताचा वापर करणे ही मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे.
- गणेश श्रीखंडे
तालुका कृषी अधिकारी, मंगळवेढा