मंगळवेढा : पेरणीकरिता शेतात वापसा आला आहे का, हे पाहण्यासाठी गेलेल्या दिवंगत माजी जिल्हाधिकारी विजय पवार यांचा मुलगा गौरव विजयकुमार पवार (वय २६, रा. सातरस्ता सुदेशना विहार, सोलापूर) यास चुलती व चुलत भावांनी मारहाण व विनयभंगाची फिर्याद देण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत गौरव पवार यांनी मंगळवेढा पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी गौरव यांचे वडील दिवंगत जिल्हाधिकारी विजय पवार यांचे २०१९ मध्ये निधन झाले. आजोबांच्या नावावर असलेली मरवडे येथील शेतजमीन ही पेरणी करण्यासाठी वापसा आला आहे का, हे पाहण्यासाठी चुलत बंधू ॲड. शिरीष राजाराम पवार यांच्याबरोबर गेले. या शेतजमिनीत चुलती संजीवनी भारत पवार व चुलत भाऊ अक्षय भारत पवार हे ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करत होते. त्यावेळी गौरव याने त्यांना आमच्या वहिवाटीची शेताची पट्टी आहे, तुम्ही येथे का पेरणी करीत आहात, असे विचारले आणि यातून त्यांच्यात वाद झाला. यावेळी त्यांनी खोटी केस करण्याची धमकी दिली. शेतातून बाहेर पडत असताना चुलती संजीवनी पवार यांनी कोयत्याने उजव्या हातावर मारले. तसेच दुधाच्या किटलीने पायावर मारून जखमी केले. त्यानंतर चुलत बंधू अक्षय पवार याने दुचाकीचा धक्का देऊन खाली पाडले. लाथाबुक्क्याने मारहाण करत जखमी केली. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.