पंढरपूर : पंढरपुरातील स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यातील अम्पायरिंगचा अनोखा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की तो इंग्लंड क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन मायकल वॉन यांच्यापर्यंत पोहोचला. त्यामुळे पंढरपुरातील अम्पायर दीपक नाईकनवरे यांच्या अम्पायरींगवर वॉन यांनी मत व्यक्त केले आहे. यामुळे पंढरपूरचा दीपक जगभरात प्रसिध्द झाला आहे.
क्रिकेट खेळामधील बॉलर, बॅटस्मन, विकेटकिपर, फिल्डर व अम्पायरचे देखील अनेकजण चाहते असतात. त्याच पध्दतीने पंढरपुरातील अम्पायर दीपक नाईकनवरे ऊर्फ डीएन रॉक यांचे सोशल मीडियाद्वारे चाहते निर्माण झाले आहेत. लहानपणापासून कलेची आवड असणाऱ्या दीपकने २०१३ मध्ये डान्स महाराष्ट्र डान्समध्ये भागही घेतला होता. त्यावेळी तो राज्यभर प्रसिध्द झाला होता. परंतु त्याला अधिक काळ स्पर्धेत आपले स्थान टिकवता आले नव्हते. सध्या दीपक महाराष्ट्रभर क्रिकेट सामन्यात अम्पायर म्हणून काम करीत आहे.
त्याने एका सामन्यादरम्यान त्यांच्या वाईड बॉल अतिशय वेगळ्या पद्धतीने दिला. पुरंदर प्रीमियर लीगमधील एका सामन्यादरम्यान जेव्हा गोलंदाजाने वाईड चेंडू टाकला तेव्हा पंचांनी याचा इशारा हाताने न देता त्यांनी आपल्या पायाच वापर केला. त्याने डोक्यावर उभे राहात त्यांचे दोन्ही पाय हातासारखे बाजूला पसरत वाईडचा निर्णय दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जगभर याची चर्चा झाली.
हा व्हिडीओ इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्याकडे पोहचला आहे. हा अम्पायरिंगचा व्हिडीओ पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन देखील दीपकचा फॅन झाला आहे. मायकल वॉननं दीपकचा एक व्हिडीओ त्याच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केला आहे.
अम्पायरिंग करणे हे तसेच अत्यंत जिकरीचे आणि कठीण काम आहे. मी प्रसिद्ध अम्पायर बिली बाऊडन यांचा फॅन आहे. त्यांना पाहून मला वेगळ्या स्टाईलनं अम्पायरिंग करण्याची प्रेरणा मिळाली. कोरोना काळात टेन्शनमध्ये असणाऱ्या लोकांना हसवण्याचे काम या निमित्ताने करत आहे. याचे मला समाधान वाटते. याबद्दल मिळेल तेवढं मानधन घेतो. मात्र माझ्या या अतरंगी अदाकारीमुळे मला सर्वत्र बोलवले जात आहे.
- दीपक नाईकनवरे, अम्पायर, पंढरपूर
फोटो :::: डोके, हातखाली करून पायवर करून वाईड बाॅलचा निर्णय देताना अम्पायर दीपक नाईकनवरे.
फोटो :::: इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनी पंढरपूरच्या दीपक नाईकनवरे यांच्या अम्पायरींगचा व्हिडीओ शेअर केला आहे.