दीडशे लीटर दुधाने अभिषेक; सिद्धाराम म्हेत्रेंना आठवला 'नायक', विरोधक म्हणाले 'खलनायक'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 12:10 PM2022-11-08T12:10:55+5:302022-11-08T12:12:40+5:30

सोमवारी आठवडा बाजाराच्या दिवशी चपळगाव आणि कुरनूर गावातील शेतकऱ्यांनी जवळजवळ १५१ लिटर दुधाने म्हेत्रे यांना अंघोळ घातली.

Former MLA Siddharam Mhetre was bathed with nearly 151 liters of milk by farmers. | दीडशे लीटर दुधाने अभिषेक; सिद्धाराम म्हेत्रेंना आठवला 'नायक', विरोधक म्हणाले 'खलनायक'

दीडशे लीटर दुधाने अभिषेक; सिद्धाराम म्हेत्रेंना आठवला 'नायक', विरोधक म्हणाले 'खलनायक'

googlenewsNext

अक्कलकोट: अतिवृष्टीच्या नुकसानीला ३० कोटी निधी मिळवून दिल्याच्या आनंदात काही शेतकरी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना दुधाने अंघोळ घातली. तेव्हा म्हेत्रे यांना नायक चित्रपटातील अनिक कपूर आठवला. मात्र, तालुक्यातील विरोधक या घटनेवर तुटून पडले. गोरगरिबांच्या तोंडचे दूध ओतून घेणारे हे तर खलनायकच आहेत, अशी टीकाही केली गेली.

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे गटाकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, अक्कलकोट तालुक्यात यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती. परंतु शासनाकडून केवळ किणी मंडळातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश होते. तेव्हा म्हेत्रे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पीकविम्याची १२५ टक्के रक्कम मिळावी यासाठी निवेदन सादर केले. त्यानंतर अक्कलकोट तालुक्याला किणी मंडलाव्यतिरिक्त ३१ कोटींचा निधी मंजूर झाला. यामुळे सोमवारी आठवडा बाजाराच्या दिवशी चपळगाव आणि कुरनूर गावातील शेतकऱ्यांनी जवळजवळ १५१ लिटर दुधाने म्हेत्रे यांना अंघोळ घातली.

चपळगाव येथील सिद्धाराम भंडारकवठे, धानप्पा डोळ्ळे, खंडप्पा वाले, सोमनाथ बाणेगाव, ब्रह्मानंद म्हमाणे, अविनाश इंगुले, बसवराज हन्नुरे, विजय कांबळे यांच्याकडून तर कुरनूरमधील सरपंच व्यंकट मोरे, अयुब तांबोळी, सुरेश बिराजदार, दयानंद मोरे, अजय शिंदे, केशव मोरे, आप्पा शिंदे, संभाजी बेडगे, किशोर सुरवसे, स्वामीराव सुरवसे, लक्ष्मण शिंगटे, नारायण मोरे आदी शेतकऱ्यांनी हा दुग्धाभिषेक केला. यावेळी अशपाक बळोरगी, सभापती प्रथमेश म्हेत्रे, मल्लिकार्जुन पाटील, सद्दाम शेरीकर, महेश जानकर, सलिम येळसंगी, मल्लिकार्जुन काटगाव, बसवराज अळ्ळोळी, सिद्धार्थ गायकवाड, शिवप्पा कुंभार, रामू समाणे, वसंत देडे, हिळ्ळी, दिलीप काजळे आदी उपस्थित होते. 

दूध सांडणे निंदनीय..

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मिळवलेले शेकडो लिटर दूध रस्त्यावर सांडणे म्हणजे हास्यास्पद व निंदनीय आहे.  एकरूख, देगावसारखे शेतकऱ्यांचे जीवनात क्रांती घडवणारी योजना यापूर्वीच पूर्ण झाली असती तर  शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती झाली असती, हे केवळ नौटंकी आहे. स्वत:ला नायक बनवून घेणारे हे खलनायक आहेत. केवळ श्रेयवादासाठी त्यांच्याकडून खटाटोप सुरू आहे. - अविनाश मडीखांबे,  तालुका अध्यक्ष, रिपाइं

अनिल कपूरची झाली आठवण...

आजवरच्या राजकारणात अनेक सत्कार स्वीकारले. परंतु आजचा सत्कार लाख मोलाचा ठरला. शेतकऱ्यांनी केलेला दुग्धाभिषेक पाहून नायक चित्रपटातील अनिल कपूरची आठवण झाली. या पुढील काळात शेतकऱ्यांसाठी आवश्यक ते प्रयत्न निश्चितपणे करणार.  -सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री

म्हेत्रेंना तेवढंच काम शिल्लक 

शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतून देणं म्हणजे पापाचे व निंदनीय काम आहे. एखादा कागद घेऊन फिरल्याने कामे होत नसतात. त्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करावे लागतात. स्वतः सत्तेत असताना तालुकावासीयांना काय न्याय दिला. हे जनतेला चांगले माहिती आहे. आता म्हेत्रेंना तेवढंच काम शिल्लक आहे. - सचिन कल्याणशेट्टी, आमदार

गरिबांना वाटले असते तर पुण्य लागले असते

वास्तविक पाहता दुधाने देवाला अंघोळ घातले जाते. काहींना म्हेत्रे हे देव वाटत असावेत, असा त्याचा अर्थ निघतो. असा त्याचा अर्थ निघतो. मात्र कार्यकर्त्यांनी शेकडो लीटर दूध वाया घालवण्याऐवजी एखादे लीटर पायावर घालून उर्वरित दूध गोरगरिबांना वाटले असते तर पुण्य लागले असते. - दिलीप सिद्धे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी

Web Title: Former MLA Siddharam Mhetre was bathed with nearly 151 liters of milk by farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.