अगोदरच कोरोनाच्या धास्तीने भयभीत झालेल्या हत्तूरमध्ये शनिवारी मध्यरात्री ११.४५ वाजता बंदुकीच्या आवाजाने गावच जागे झाले. माजी सरपंच इब्राहीम नदाफ यांनी त्यांच्या जुन्या पडक्या वाड्यात स्वतःच्या परवाना असलेल्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडली. समोरच्या घरातून नातलग घटनास्थळी धावले. तोपर्यंत ते ठार झाले होते. १२ बोरच्या बंदुकीतून कानशीलाजवळ त्यांनी नेम धरला होता. गोळीने त्यांचा संपूर्ण चेहरा छिन्नविच्छिन्न झाला होता.
रात्री उशिराने विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. नदाफ जागीच ठार झाल्याने त्यांचे शव विच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या आत्महत्येमागचे कारण पोलिसांनाही समजू शकले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नदाफ हे नैराश्यात होते. त्यांच्यावर दोन वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाली होती. आर्थिक अडचणही फारशी नव्हती, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
बंदुकीतून गोळी झाडलीच कशी?
इब्राहीम नदाफ यांचा बंदूक बाळगण्याचा परवाना आहे. साडेतीन फूट लांबीची ही बंदूक असून त्यातून स्वतःवर गोळी झाडता येत नाही, तरीही त्यांनी ही गोळी झाडलीच कशी? अशी प्रत्यक्षदर्शींमध्ये चर्चा होती.
फोटो
०९इब्राहिम नदाफ