बार्शी : लॉकडाऊनचा फटका आता थेट रूग्णांनादेखील बसत आहे. पन्नास वर्षीय मातेने आपल्या एकुलत्या एका चौदा वर्षीय मुलीला रक्त मिळवण्यासाठी भर उन्हात तब्बल चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा उस्मानाबाद ते बार्शी असा पायी प्रवास केला.
उस्मानाबाद येथील शोभा नाईकवाडी यांच्या पतीचे निधन झाले असून, त्यांना सई नावाची चौदा वर्षीय मुलगी आहे. दुर्दैवाने सईला जन्मजात थॅलेसीमिया हा आजार जडला आहे. त्यामुळे साधारणत: 15 ते 20 दिवसाला तिचे रक्त वारंवार बदलावे लागते़ त्यामुळे सईला रक्ताची नितांत गरज भासते. मागील सुमारे अडीच वर्षांपासून सईला नॅट चाचणी केलेले रक्त देण्यासाठी तिची आई शोभा या बार्शीतील रेडक्रॉस संचलित श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीत येतात.
मार्च महिन्याच्या उत्तरार्धात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात व राज्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आला. त्याचा फटका नाईकवाडी कुटुंबीयांना बसला. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर एकदा शोभा नाईकवाडी यांनी बार्शीत येऊन नॅट चाचणी केलेले रक्त नेले मात्र लॉकडाऊनच्या तिसºया टप्प्यात बुधवारी सईला रक्ताची गरज असल्याने त्या घरातून सकाळी साडेआठ वाजता नाष्टा करून बाहेर पडल्या.
उस्मानाबाद येथील हॉस्पिटलमध्ये जाऊन नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलीच्या रक्ताचे सॅम्पल घेतले. नॅट चाचणी केलेले रक्त उस्मानाबाद येथे मिळत नसल्याने त्यांनी बार्शीत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांना जिल्हाबंदीचे कारण पुढे करत कोणीही मदत करण्यास पुढे आले नाही. बस व खासगी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्यांना बार्शीला जाण्यास अडचण निर्माण झाली.
मुलीसाठी रक्त आणण्यासाठी एकट्याच निघालेल्या शोभा नाईकवाडी यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील लमाणतांडा येथील चेकपोस्ट नाक्यावर पोलिसांनी अडवले.
रक्त आणण्यासाठी बार्शीला जात असल्याचे सांगूनदेखील पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला व त्यांना थांबवले. मात्र मुलीच्या जीवासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शोभा नाईकवाडी यांनी उन्हाचे चटके सोसत वाटेत आलेल्या अडचणींवर मात करत अखेर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बार्शीची रामभाई शाह रक्तपेढी गाठली.
बार्शीच्या रुग्णवाहिकेतून पाठविले उस्मानाबादला- रक्त आणण्यासाठी आलेल्या शोभा नाईकवाडी यांची माहिती मिळताच रक्तपेढीच्या व्यवस्थापनाने माणुसकी जपत त्यांना जेवण देत पैसे न घेता मोफत नॅट प्रमाणित रक्त दिले. तसेच त्यांना रक्तपेढीच्याच स्वतंत्र रूग्णवाहिकेद्वारे उस्मानाबादला पाठविण्याची व्यवस्था केली. शोभा नाईकवाडी यांनी रक्त मिळवण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना नाईकवाडी कुटुंबीयांनी व्यक्त केली.
थॅलेसीमिया हा अनुवंशिक आजार असून, तो पालकांकडून अपत्यास संक्रमित होतो. थॅलेसीमियाग्रस्त रूग्णांच्या लाल रक्तपेशींचे मोठे नुकसान होते़ त्यामुळे रूग्णाला अशक्तपणा जाणवतो. लाल रक्तपेशींचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी रूग्णाला सातत्याने दर वीस ते तीस दिवसाला रक्त संक्रमण करण्याची गरज असते अजित कुंकूलोळ, उपाध्यक्ष, रेडक्रॉस सोसायटी, बार्शी