एल. डी. वाघमोडे
माळशिरस : एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाºया माळशिरस तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोहिते-पाटील, जानकर या कट्टर विरोधकांचे मनोमिलन झाले़ त्यानंतर मतदारसंघात भाजपच्या विजयाची पायाभरणी झाली. या नेत्यांनी प्रचारात परिश्रम घेतल्यामुळे रणजितसिंह निंबाळकरांना लाखापर्यंत आघाडी मिळाली.
माळशिरस तालुका माढा लोकसभा मतदारसंघाचा राजकीय केंद्रबिंदू ठरला होता़ मतदारसंघातील उमेदवारीच्या विषयावरून राजकीय नाट्य रंगले़ शरद पवारांनी घेतलेली माघार, मोहिते-पाटील यांचा भाजप प्रवेश, मूळ भाजप नेतेमंडळींचे नव्या नेत्यांबरोबर झालेले मनोमिलन अशा अनेक राजकीय घडामोडींमुळे माढा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. तालुक्यात नेतेमंडळींच्या एकत्रिकरणानंतर राष्ट्रवादी तालुक्यातून हद्दपार होईल, अशी चर्चा एका गोटातून होत असतानाच राष्ट्रवादीने केलेल्या साखरपेरणीमुळे राष्टÑवादी काँग्रेसला काही प्रमाणात मते घेण्यात यश मिळाले. यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व भाजप यांच्यात कांटे की टक्कर होणार, हे आतापासूनच जाणवायला लागले आहे.
तालुक्याच्या राजकारणावर असलेली मोहिते-पाटील कुटुंबाची पकड, विरोधी गटातील नेतेमंडळींचा भाजपबरोबर राहण्याचा मानस याशिवाय तालुक्याला नीरा उजवा कालवा जीवनदायी ठरला आहे़ दरम्यानच्या काळात राजकीय चढाओढीत या कालव्यातील लाभधारकांना पुरेसे पाणी मिळत नाही, वर्षानुवर्षे चर्चेचा विषय ठरलेला नीरा-देवधर प्रकल्प, राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवसंजीवनी देणारी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना अशा महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर मतदारांच्या मनात रुजली. शिवाय राजकीय समीकरणाची गणितं जुळविण्यात भाजपच्या नव्या-जुन्या नेतेमंडळींना यश आल्यामुळे भाजपच्या उमेदवाराच्या यशाची पताका रोवली गेली.
मोहिते-पाटलांची ठरली कसोटीतालुक्यात मोहिते-पाटील कुटुंबाने आपल्या राजकीय ताकदीची कसोटी पणाला लावली होती. तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर कुटुंबातील नेतेमंडळींनी जीवाचे रान करून प्रचाराची धुरा सांभाळत होते़ त्यांच्या साथीला जुन्या भाजप नेत्यांनी ‘री’ ओढली़ रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, झेडपी सदस्य स्वरुपाराणी मोहिते-पाटील, शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली होती तर मूळ भाजपतील उत्तमराव जानकर, के. के़ पाटील, राजकुमार पाटील, बाळासाहेब सरगर या नेतेमंडळींनी प्रचारात बाजी मारली़ राष्ट्रवादीच्या ढासळत्या बुरुजाला आधार देण्यासाठी आ़ रामहरी रुपनवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शंकर देशमुख, धैर्यशील देशमुख, सुरेश टेळे, फत्तेसिंह माने-पाटील, पांडुरंग देशमुख या नेतेमंडळींनी प्रयत्नांची पराकाष्टा केली.