शीतलकुमार कांबळे, सोलापूर: आसरा चौक येथे साडेचार फूट लांब असणारी घोरपड आढळली. याची माहिती मिळताच सर्पमित्रांनी घोरपडीला पकडले. त्याची माहिती उपस्थितांना देऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडले.
आसरा चौक येथे इंजिन सोसायटीमध्ये घर नंबर 20 राठोड यांच्या घरी झाडाच्या जाळीमध्ये घोरपड अडकली होती. त्यांनी सर्पमित्र इस्माईल रंगरेज यांच्याशी संपर्क साधला. सर्पमित्र इस्माईल रंगरेज व इम्रान पटेल हे लगेच घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यानंतर त्यांना जाळीत घोरपड दिसून आली. कुटुंबियांना जाळीत नेमकं अडकलं काय हे समजतं नव्हते, त्यामुळे ते भयभीत झाले होते.
सर्पमित्रांनी जाळीतून घोरपडीची सुटका केली. तिची लांबी पाहिली असता ती साडेचार फूट दिसून आली. सर्पमित्रांनी घोरपडीची माहिती उपस्थितांना देऊन घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले. त्यानंतर घोरपडीला निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.