सांगोला : महिला प्रवाशांना वाहनांमध्ये बसवून त्यांना निर्जनस्थळी नेऊन मारहाण करून दागिनेसह रोकड लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे आणि सांगोला पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात चौघांना पकडले असून त्यांच्याकडून कारसह १ लाख ५७ हजारांचे दागिनेसह पाच लाख ५७ हजारांचा ऐवज जप्त केला आहे आहे.
सांगोला व मंद्रूप पोलीस स्टेशनला अशा दाखल गुन्ह्यातील आरोपींचा तपास करून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेस पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने जिल्ह्यातील अशाप्रकारे जबरी चोरी करणाऱ्या आरोपींच्या मागावर होते.
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे गस्त घालत होते. दरम्यान, चौघे कारमधून कुर्डूवाडीहून टेंभुर्णीकडे निघाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कारमधील लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगोला पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिली. या आरोपीना सांगोला पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यात अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये, ५ तोळे वजनाचे दागिनेसह ९ मोती, मंद्रूप पोलीस स्टेशन पाच लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, सहाय्यक निरीक्षक नागेश यमगर, स्थानिक गुन्हे शाखेचे बिरुदेव पारेकर, श्रीकांत गायकवाड, सलीम बागवान ,परशुराम शिंदे, लालसिंग राठोड, अजय वाघमारे, राहुल सुरवसे पोलीस नाईक दत्ता वजाळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख ,पोलीस कॉस्टेबल बाबासाहेब पाटील यांनी कामगिरीत सहभाग नोंदविला.