सोलापूर: तोट्यातील आणखीन चार शाखा २ मेपासून बंद करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला असून, यामुळे बंद झालेल्या शाखांची संख्या १२ तर स्थलांतरित शाखांची संख्या चार इतकी झाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सतत १० वर्षे तोट्यातील शाखा बंद करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. यामुळे जिल्हा बँक संचालक मंडळाने यापूर्वीच ८ शाखा बंद केल्या असून, चार शाखांचे स्थलांतरही केले आहे. नव्याने औराद(दक्षिण सोलापूर), चुंगी(अक्कलकोट), नंदेश्वर(मंगळवेढा) व सौंदणे(मोहोळ) या शाखा २ मेपासून बंद करण्यात येणार आहेत.
यापूर्वी बीबीदारफळ, विरवडे, सिद्धापूर, म्हैसगाव, उडगी, राळेरास, भोगावती साखर कारखाना, बादोले या गावांतील शाखा तोट्यात असल्याने बंद करण्यात आल्या आहेत. आहेरवाडीची शाखा सौंदणेला, पोथरेची शाखा आवाटीला, देवगावची शाखा परंडा रोड बार्शी व बावी(बार्शी)ची शाखा माजलगाव(करमाळा) येथे स्थलांतरित करण्यात आली आहे. ज्या शाखा सतत १० वर्षे तोट्यात आहेत अशा २० शाखा बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तोट्यातील शाखांना ठेवी वाढविण्याची संधी दिल्यानंतरही सुधारणा होत नसल्याने टप्प्याटप्प्याने अशा शाखा बंद केल्या जात आहेत.
ठेवीत झाली मोठी घट- औराद शाखेत मार्च १७ मध्ये ६ कोटी ५१ लाख ३१ हजार रुपये असलेली ठेव मार्च २०१८ मध्ये चार कोटी ३ लाख ६३ हजार रुपये, चुंगी शाखेत मार्च १७ मध्ये तीन कोटी ९३ लाख ६३ हजार रुपये असलेल्या ठेवी ३ कोटी २८ लाख, नंदेश्वर शाखेत मार्च १७ असलेल्या ४ कोटी ९३ लाख ठेवी ३ कोटी ९९ लाख तर सौंदणे या स्थलांतरित शाखेच्या ठेवी वर्षभरात २० लाख रुपये इतक्याच राहिल्या.