धनाजी शिंदे वैराग : बार्शी तालुक्यात सत्यमेव जयते ‘वॉटर कप स्पर्धा -२०१८’मध्ये प्रथम क्रमांक व १० लाख रुपयांचे बक्षीस पटकावण्यासाठी चुंब, खडकोणी, राळेरास, रातंजन या चार गावांत चुरस निर्माण झाली आहे. या चार गावांची निवड मूल्यांकनातून झाली आहे. याचा फैसला १२ आॅगस्ट रोजी पुणे येथे होणाºया बक्षीस वितरण कार्यक्रमात होणार आहे. प्रथम क्रमांक कोण पटकावणार याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
बार्शी तालुक्यात २०१८ वॉटर कप स्पर्धा (८ एप्रिल ते २२ मे २०१८) या ४५ दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आली. यामध्ये ४९ गावांनी सहभाग घेतला. त्यापैकी ३४ गावांनी प्रशिक्षण घेतले. तालुक्यात या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या गावांनी केलेला लोकसहभाग श्रमदान, यांत्रिक पद्धतीने सुमारे २५ लाख घनमीटरचे काम झाले.
या कामामुळे बार्शी तालुक्यात वार्षिक २५० कोटी लिटर पाणीसाठा निर्माण करण्याची क्षमता झाली. शासकीय मूल्यांकनाने या कामाची किंमत ५० कोटी रुपये इतकी होते, मात्र हे काम केवळ ४५ दिवसात झाले. यासाठी हजारोंचा लाभलेला लोकसहभाग, प्रशासकीय अधिकाºयांचा थेट सहभाग, बार्शीचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांचे प्रोत्साहन व थेट सहभाग, भारतीय जैन संघटनेने आर्थिक पाठबळामुळे तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे उभी राहिली.
तसेच पाणी फाउंडेशनच्या टीमला ग्रामस्थांच्या श्रमाचे मोल, महत्त्वाचे व या उपक्रमाला वेळोवेळी मार्गदर्शन करता आले. रविवारी १२ आॅगस्ट रोजी राज्यभरातील सहभागी गावातून नियम, गुण व मूल्यांकनातून निवडलेल्या गावामध्ये राज्य व तालुकास्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अभिनेते अमीर खान, उद्योगपती व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
ही आहेत गावे- तालुक्यातील चुंब, खडकोणी, राळेरास, रातंजन या चारपैकी एका गावाची तालुक्यातून निवड केली जाणार आहे. निवडलेल्या गावास सन्मानपत्र, १० लाख रुपयांचे बक्षीस ‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने दिले जाणार आहे. यामध्ये कोणत्या गावाची निवड होणार, याकडे संपूर्ण तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.