सोलापूर : विजापूर रोडवरील सोरेगावजवळील नागेश डान्सबारवर दुसऱ्यांदा पुन्हा धाड टाकण्यात आली. धाड पडताच चार नृत्यांगना अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्या तर १० जणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागेश डान्सबारमध्ये नियमाचे उल्लंघन करून डान्स सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी धाड टाकली.
पोलिसांनी धाड टाकल्यानंतर आतमध्ये वरच्या मजल्यावर व खाली दोन्हीकडे नृत्यांगना नृत्य करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच डान्सबारमध्ये एकच खळबळ उडाली. वरच्या मजल्यावर असलेल्या चार नृत्यांगना अंधाराचा फायदा घेऊन पाठीमागील दारातून पळून गेल्या. खालच्या मजल्यावर असलेल्या १० नृत्यांगनांना भरारी पथकाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. ऑर्केस्ट्रा बारवर डान्सबारला शासनाने परवानगी दिली असली तरी आतमध्ये कोरोना नियमाचे उल्लंघन होत असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले.
फक्त मोजक्याच नृत्यांगनांना परवानगी असताना खाली आणि वर दोन्ही ठिकाणी १४ महिला नृत्य करीत होत्या असे समजते. ही कारवाई भरारी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, हवालदार भालशंकर, पोलीस नाईक योगेश बर्डे, पोलीस नाईक वाजिद पटेल, पोलीस नाईक शीला काळे, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळुंखे, नरेंद्र नक्का यांनी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ऑक्टोबर महिन्यातच सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी धाड टाकली होती. त्यानंतर अवघ्या ४० ते ४५ दिवसात पुन्हा त्याच ठिकाणी दुसऱ्यांदा धाड पडल्याने ऑर्केस्ट्राबार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.