सोलापूर : आषाढी एकादशी साेहळ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक रविवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमाराला नांदेडहून साेलापूर विमानतळावर दाखल झाले. साेलापुरात त्यांचा ताफा पंढरपूरकडे रवाना झाला. आषाढी एकादशीचा साेहळा २९ जून राेजी हाेणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करतात. एकादशीच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्र्याचे पंढरपुरात आगमन हाेते. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा प्रथमच चार दिवस आधी पंढपुरात येत आहेत.
नियाेजित दाैऱ्यानुसार रविवारी नांदेड येथे रविवारी त्यांचा कार्यक्रम हाेता. हा कार्यक्रम संपवून मुख्यमंत्र्यांचे विमान साेलापुरात दाखल झाले. साेलापूर पाेलिसांना या दाैऱ्याची माहिती रविवारी दुपारी दाेन वाजता मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विमानतळ ते पंढरपूर या मार्गावर पाेलिस बंदाेबस्त लावण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दर्शन रांग, वाखरी रिंगण साेहळ्याच्या स्थळावर पाहणी करणार आहेत. राज्याचे आराेग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून पंढरपुरात महाआराेग्य शिबीर हाेणार आहे. या शिबिराच्या तयारीची पाहणी करणार असल्याचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी सांगितले.