सोलापूर : शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निश्चित झाले असताना अनेक भागात चार दिवसाआड पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. त्यातच औज बंधारा कोरडा पडला आहे. जलसंपदा विभाग उजनी धरणातून पाणी सोडण्यास तयार नसल्याने महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. यावरुन गुरुवारी होणाºया महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ होण्याची चिन्हे आहेत.
शहरातील पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या औज बंधाºयासाठी उजनीतून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाकडे एकूण पाचवेळा केली आहे. जलसंपदा विभागाने हे पाणी १० एप्रिलपर्यंत पुरवा, असे सांगितले आहे. पण प्रत्यक्षात कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पाणी उपसा झाल्याने औज बंधाºयातील पाणी लवकर कमी झाले आहे. जलसंपदा विभागातील अधिकाºयांना लवकर पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत यासाठी मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी चर्चा केली होती.
सध्या टाकळी इनटेकमध्ये असलेले पाणी २५ मार्चपर्यंत पुरेल. त्यानंतर आठवडाभर पाच दिवस पाणीपुरवठा होईल. यानंतर शहरावर जलसंकट ओढावू शकते. उजनीतून १५ मार्चला पाणी सोडल्यास ते २३ मार्चपर्यंत औज बंधाºयात पोहोचेल, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. पण जलसंपदा विभागाकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही. जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने त्यांच्याकडूनही पाठपुरावा होत नसल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सर्वसाधारण सभेत गोंधळाची शक्यता
- - शहराच्या अनेक भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जुळे सोलापुरातील नागरिकांनी याबाबत नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत. या विषयावरुन भाजपा नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांशी काही नगरसेवकांनी चर्चा केली. याबाबत पाणीपुरवठा विभागातील अधिकारी सिद्धेश्वर उस्तुरगे म्हणाले, शहरात तीन दिवसाआड पाणी दिले जात आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.
जुळे सोलापुरातील अनेक नगरांमध्ये बुधवारी चार दिवसांनंतर आणि कमी दाबाने पाणी आले आहे. याबाबत चावीवाल्यांकडे चौकशी केल्यावर त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार चार दिवसाआड पाणी सोडत असल्याचे सांगितले आहे. - सिद्धय्या स्वामीनागरिक, सिद्धेश्वरनगर.