पंढरपूर : शेगाव दुमाला (ता. पंढरपूर) येथील पीर वस्तीतील एका शेतकऱ्याच्या चार शेळ्यांना बिबट्या सदृश्य प्राण्याने फस्त केल्याची घटना आज ( मंगळवारी) पहाटे घडली आहे.
मागील पाच महिन्यापूर्वी वाखरी (ता. पंढरपूर) या गावात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, गायी, कुत्र्यांची शिकार केली होती. तसेच गावातील अनेक ग्रामस्थांनी बिबट्याला पाहीले होते. यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते. परंतु बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले नाही. यानंतर त्या परिसरातून बिबट्या निघून गेल्याचे सांगण्यात आले होते.
परंतु मंगळवारी पहाटे शेगाव दुमाला येथील चार शेळ्यांची शिकार झाल्याचे दिसून आले आहेत. ही शिकार बिबट्या सदृश प्राण्याने केल्याचा गावकऱ्यांचा अंदाज आहे. याबाबतची माहिती वन क्षेत्रपाल विलास पवळे यांना ग्रामस्थांनी दिली. त्यानुसार विलास पवळे यांनी शेगाव दुमाला येथे वन विभागाचे पथक तपासणीसाठी पाठवले आहे. बिबट्या सदृश्य प्राणी असल्याचे चर्चेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.