लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे उप अभियंता रघुनाथ गायकवाड यांनी सीना नदीचे पाणी शेवटच्या कोर्से गाव बंधाऱ्यात लवकर पोहोचण्यासाठी वीजपुरवठ्यात कपात करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. पाण्याचा सातत्याने उपसा सुरू झाला, तर नदीचे पाणी शेवटच्या कोर्सेगाव बंधाऱ्यात पोहोचणार नाही. त्यामुळे हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रत महावितरणला देण्यात आली. त्यानंतर, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली. सीना नदीच्या दोन्ही काठांवरील गावांतील विद्युत पंपाना रोज केवळ चार तास वीजपुरवठा होणार आहे.
कोर्सेगाव बंधाऱ्यात पाणी जाण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. टेलएन्डपासून बंधारे भरण्याची शेतकऱ्यांची मागणी असली, तरी यापूर्वी असे घडत नव्हते. अनेकदा भीमा-सीना जोडकालव्यातून सीना नदीत पाणी सोडले की, ते मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड बंधाऱ्यात पडताच प्रवाह बंद होतोय, अशी शेतकऱ्यांची तक्रार होती. बऱ्याचदा शिंगोली बंधाऱ्यातच उजनीचे पाणी अडखळत असे. यावेळी जलसंपदा खात्याने दखल घेतल्याने सीनेच्या पाण्याचा कोर्सेगाव बंधाऱ्यापर्यंतचा मार्ग सुकर होणार असे दिसते.
------
५७ गावांना काढावी लागणार कळ
अर्जुनसोंड बंधाऱ्यानंतर पाकणी, शिंगोली, अकोले(म), नंदूर, वडकबाळ , सिंदखेड, बंदलगी, कोर्सेगाव बंधारा असा पाण्याचा प्रवास होणार असून, सीना नदीकाठच्या दोन्ही बाजूच्या ५७ गावांना वीजकपातीचा फटका बसणार आहे. ऐन उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याची गरज भागवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.
------
स्वतंत्र फीडर बसविण्याची मागणी
उजनीचे पाणी सोडताना भीमा-सीना नदीकाठच्या गावांना दरवेळी या वीजकपातीला तोंड द्यावे लागते. नद्या कोरड्या पडल्याने पाणीटंचाई तर पाणी सोडल्यानंतर बऱ्याचदा समोर मुबलक पाणी असूनही ते उचलता येत नाही. पाणी पुढे सरकत नसल्याच्या कारणाने काठावरील वीजपंप बंद करावे लागतात. या काळात पाण्याचे नदीशिवाय विहिरी, बोअर, शेततळी आदी स्रोत असले, तरी वीजपुरवठा बंद केल्यामुळे त्यांना पाणी उपसा करता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या वीजपंपासाठी स्वतंत्र फीडर बसविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
-----