सोलापूर : एकाच रात्रीत चार घरं फोडूनल चोरट्यांनी तिजोरी व पत्र्याच्या पेटीतून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने, मिक्सरसह रोख १ लाख ६३ हजार ५०० रुपये चोरून धूम ठोकली. खळबळ उडवून देणारी ही घटना रविवार, १ मे रोजी पहाटे ३ वाजण्यापूर्वी सांगोला तालुक्यात संगेवाडी येथे घडली. याबाबत भारत विठ्ठल खंडागळे (रा. संगेवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी भारत खंडागळे हे शेतक-याकडून भाजीपाला खरेदी करून घाऊक विक्रीचा व्यवसाय करतात. ३० एप्रिल रोजी भाजीपाला खरेदी करून तो वाहनात भरून विक्री करता पाठवून दिला व रात्री ११ च्या सुमारास जेवण करून रात्री १२ च्या सुमारास दाराला बाहेरून कडी लावून घरासमोरील कट्ट्यावर झोपी गेले.
दरम्यान चोरट्यांनी मध्यरात्री त्यांच्या घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या चार पिळ्याच्या अंगठ्या, म्हैस व मकेची ओली वैरण यांच्या विक्रीतून आलेले रोख १ लाख रुपये असा ऐवज लाबंवला.
रविवारी पहाटे तीनच्या सुमारास पत्नी लताबाई हिने पतीला उठवून घराचा दरवाजा उघडा असल्याचे दाखविले. त्यांनी घरात डोकावले असता घरातील सामान, कपडे अस्ताव्यस्त पडलेले निदर्शनास आले. खोलीमधील लोखंडी कपाट उघडे दिसले. घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. जाता-जाता चोरट्यांनी खुंटीला अडकवलेल्या सुदर्शन खंडागळे यांच्या पँटेच्या खिशातून रोख ३,५०० हजार रुपये काढून घेतले. तेथून चोरट्यांनी आपला मोर्चा संतोष खंडागळे यांच्या घराकडे वळवला. संतोषने गाय विक्रीचे ६० हजार रुपये व आईचे दीड तोळे सोन्याचे मंगळसूत्र ठेवलेली पत्र्याची पेटी उचलून घराच्या पाठीमागे नेऊन फोडली. त्यातील रोकड व सोन्याचे दागिने काढून पेटी फेकून दिली. तेथून चोरट्यांनी जवळच असणा-या पंकज वाघमारे यांच्या घरातून मिक्सर चोरून पसार झाले.