सोलापूर : कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा उद्या गुरुवारी लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत पंढरीत पार पडत आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला पंढरीत सुमारे ४ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. श्री विठुरायासह रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेतही लाखांवर भाविक उभे आहेत. ही दर्शनरांग पत्राशेडच्या बाहेर गोपाळपूर रस्त्यावर गेली आहे. दरम्यान, शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी पंढरपुरात दाखल होणार आहेत. सपत्नीक ते श्री विठ्ठल आणि रखुमाईची महापूजा करणार आहेत. याचवेळी कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह अन्य राज्यातील अन्य मंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचीही उपस्थिती असणार आहेत.
दरम्यान, पहाटे साडेतीनच्या सुमारास शासकीय महापूजा होणार आहे. फडणवीसांसोबतच मंत्रिमंडळातील काही मंत्री, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महसूल, जिल्हा परिषद व पोलिस प्रशासनातील अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. मंदिर समितीने याची तयारी केली असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले असून संताचे लहान मोठे पालखी सोहळेही पंढरपुरात दाखल झाले आहेत. कायदा, सुव्यवस्था, गर्दीवरील नियंत्रण मिळविण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. पंढरपूर शहरात येणारी जड वाहतूक बंद केली असून या जड वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
कार्तिकी एकादशीला आलेले भाविक चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे एकादशी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी चंद्रभागा परिसर फुलला आहे. भाविक स्नानाचा आनंद घेत आहेत. श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविक रांगेत उभे आहेत. दर्शन रांग पत्राशेडमध्ये पोहोचलेली आहे. या दर्शनरांगेत दोन लाखांहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत. मंदिर समितीच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.