श्रीपूर : अकलूज येथील वसंतविहार पोलीस वसाहतीमध्ये सोमवारी (दि. १३) पहाटे जबरी चोरीची घटना घडली. त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून तीन लाख ८९ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरी करून चोरटे पसार झाले. पोलिसांच्या वसाहतीत जाऊन घरामध्ये जबरी चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व आरोपी फरार आहेत. अकलूज पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदला आहे.
पोलीस सूत्रांनुसार पोलीस कर्मचारी अमोल बापूसाहेब मिरगणे (रा. वसंतविहार पोलीस वसाहत, खोली क्र. ५५, अकलूज) येथे आपल्या कुटुंबासह राहतात. गौरी-गणपतीचे सणासाठी मूळ गावी बार्शी येथे सर्व कुटुंब गेले होते. तसेच अमोल मिरगणे तपास कामासाठी बाहेरगावावरून आले असता त्यांच्या घराचा दरवाजा कुलूप व कोयंडा उचकटलेला दिसला. त्यांनी गेट उघडून घराचे आतमध्ये प्रवेश केला असता अनोळखी इसम कटावणीने कपाट उघडण्याचा प्रयत्न करीत होता. अमोल मिरगणे यांना पाहताच ते अंगावर येऊन त्यांनी कोयता उगारून पैसे कोठे आहेत, सोने कोठे आहे दाखव, नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यांनी कपाट उघडून कपाटातील दागिने व पैसे काढून घेतले. त्यावेळी चोरट्यांची व पोलीस अमोल मिरगणे यांच्यात झटापट झाली. त्यामध्ये ते किरकोळ जखमी झाली. त्याचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले.
चोरट्यांनी जबरीने चोरून नेलेल्या ऐवजामध्ये सोन्याचे गंठण (२० ग्रॅम, किंमत ८०,०००), सोन्याचे नेकलेज (८०,०००), एक अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन (एक लाख रुपये), सोन्याच्या अंगठ्या (८०,०००), सोन्याची नथ (चार हजार), ४ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याची कर्णफुले (१५ हजार), ३० हजार रुपये रोकड, असा तीन लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याने अनोळखी चार चोरट्यांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
----