वैराग : भोगावती (ता. बार्शी) नदीपात्रातून अवैध वाळू भरून घेऊन जात असताना वाळू व बैलगाडीसह ४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी वैराग पोलिसात गुन्हा नोंदला आहे. यामध्ये सात हजार रुपयांच्या १ ब्रास वाळूचा समावेश आहे.
पोलीस सूत्रांनुसार सोमवारी सकाळी तडवळे (ता. बार्शी) हद्दीत फिर्यादी पोलीस रामेश्वर शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत होते. भोगावती नदीपात्रात अवैध वाळूची चोरी होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. पंचासमक्ष पाहणी करता केली असता तडवळे गावाजवळ भोगावती नदीच्या पात्रात येडेश्वरी मंदिरासमोर ८ बैलजोड्या व ८ बैलगाड्या अवैधरीत्या वाळू भरून जात असल्याचे दिसले. त्यांना ताब्यात घेऊन तुळशीदास हनुमंत लोखंडे (वय ३३), आकाश विष्णू व्यवहारे (२४), धीरज मारुती लोखंडे (२१), हरी नारायण नरवडे (५५, सर्व रा. तडवळे) यांच्यासह सात हजार रुपये किमतीच्या १ ब्रास वाळूसह ४ लाखांच्या ८ बैलगाड्या ताब्यात घेतल्या. त्याच्यावर वैराग पोलिसात गुन्हा नोंदला आहे.