सोलापूर : महापारेषण कंपनीच्या पुणे परिमंडलांतर्गत सध्या २२० केव्ही भाळवणी-माळीनगर वाहिनीच्या उभारणीचे काम सुरू आहे. या वाहिनीचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून एक किमी अंतराचे काम शिल्लक राहिले आहे. वाहिनीचे कंडक्टर ओढण्याचे काम सुरू असताना या वाहिनीचे चार मनोरे वादळी वाºयामुळे कोसळले. या घटनेत कंत्राटदाराचे दोन कामगार जखमी झाल्याची घटना बुधवार २० मे रोजी घडली. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने ऊर्जामंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
महापारेषणच्या पुणे परिमंडलांतर्गत येणाºया सर्वच भागात सध्या उपकेंद्र, वाहिन्या उभारणीचे काम सुरू आहे. एवढेच नव्हे वीजजोडणीचेही काम वेगाने होत आहे. खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून २२० केव्ही भाळवणी - माळीनगर वाहिनीचे काम मागील काही वर्षांपासून सुरू होते.
मार्चअखेर हे काम पूर्ण होणार होते; मात्र कामाची गती मंदावल्याने हे काम पूर्ण होण्यास मे महिना उजाडला. त्यात कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली अन् काम आणखीन काही महिने थांबले. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात हे काम पुन्हा सुरू करण्यात आले; मात्र २० मे २०२० रोजी उभा करण्यात आलेले चार मनोरे वादळी वाºयामुळे कोसळले. कोसळलेल्या मनोºयामुळे या परिसरातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय पूर्ण होणारे काम आणखीन वर्षभरापर्यंत तरी वाढणार असल्याचे दिसून येते.
लॉकडाऊन काळात काम कसे चालू होते?- महापारेषणच्या वतीने उभारण्यात येणारे भाळवणी ते माळीनगरच्या मनोरा उभारणीचे काम लॉकडाऊन काळात कसे सुरू होते असा सवाल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने ऊर्जामंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. स्थानिक प्रशासनाची परवानगी संबंधित कंत्राटदाराने घेतली किंवा महापारेषणने घेतली होती का ? सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले होते का ? सुरक्षिततेबाबत काय काय उपाययोजना होत्या ? असे अनेक प्रश्न वर्कर्स फेडरेशनने निवेदनाव्दारे उपस्थित केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात काम पूर्ण करण्याच्या नादात पडलेले मनोरे उभे करण्यासाठी ८ महिन्यांचा काळ लागेल असे महापारेषणकडून सांगण्यात आले.
भाळवणी-माळीनगर वाहिनीच्या कोसळलेल्या कामांची चौकशी व्हावी, संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, भविष्यात असे निकृष्ट कामाचे नमुने पुढे येणार नाही याबाबत महापारेषण प्रशासनाने काळजी घ्यावी. कामांच्या गुणवत्तेबाबत जे अभियंते, कर्मचारी दखल घेत नाहीत त्यांच्यावरही कारवाई करावी. यापुढील कामासाठी पुरेसे मनुष्यबळ देऊन पूर्वीप्रमाणेच उपकेंद्र व वाहिन्यांच्या उभारणीची कामे ही कंपनी कर्मचाºयांकडूनच करावी.- कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन
केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार आवश्यक त्या परवानग्या घेऊनच भाळवणी ते माळीनगर दरम्यानच्या मनोरा उभारणीचे काम कंत्राटदारामार्फत केले आहे. मनोरे पडले आहेत याबाबतची चौकशी करण्यात येत आहे. अशा घटना वारंवार घडू नये यासाठी महापारेषणकडून दक्षता घेण्यात येत आहे.या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करू, कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करू.- वंदनकुमार मेंढे, मुख्य अभियंता, महापारेषण, पुणे परिमंडल