कुर्डूवाडी : भेंड (ता. माढा) येथील गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या सामजिक, राजकीय क्षेत्रात स्थान निर्माण केलेल्या कुटुंबातील चार जबाबदार व कमावत्या सदस्यांचा महिनाभरात मृत्यू झाला. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोघा भावांचादेखील त्यातच मृत्यू झाला. आता धाकट्या भावांवर अचानकपणे कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.
भेंड गावातील सधन व एकत्रित राहत असलेल्या प्रभाकर नीळकंठ भोसले यांच्या कुटुंबाला आदर्श कुटुंब म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याकडे १०० ते १२५ एकर जमीन असून, आनंदी कुटुंबावर कोरोनाची सावली पडली.
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात १ मे रोजी ७३ वर्षीय प्रभाकर भोसले या कुटुंब प्रमुखाला अचानकपणे कोरोनाने गाठले. त्यातच त्यांचे कुर्डूवाडी येथे उपचारादरम्यान निधन झाले. २ मे रोजी ६५ वर्षीय पत्नी राधिका प्रभाकर भोसले यांनाही कोरोनाने घेरले. त्यांचेही टेंभुर्णी येथील दवाखान्यात उपचार घेत असताना निधन झाले.
यादरम्यान आई-वडिलांच्या सेवेसाठी तत्पर असणारा थोरला मुलगा रणजित प्रभाकर भोसले (वय ४६) यालाही कोरोनाने गाठले. बार्शी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना ८ मे रोजी तो मरण पावला. या सर्व घटना घडत असताना कुटुंबातील इतर सदस्यांना सांभाळून आई, वडील व भावासाठी धावपळ करणारा मधला भाऊ व सोसायटी सचिव म्हणून नोकरी करीत असलेले रवींद्र प्रभाकर भोसले (वय ४३) यांनाही कोरोनाने सोडले नाही. त्यातच सोलापुरात एका दवाखान्यात उपचार घेत असताना त्यांचेही निधन झाले. हा संपूर्ण घटनाक्रम महिनाभरात घडला आहे.
कुटुंबामध्ये सर्वात अगोदर सोसायटीचे सचिव असलेले रवींद्र यांना कोरोनाने गाठले होते. परंतु त्यांच्यावर खूप दिवस उपचार सुरू होते. आई-वडील व लाडक्या भावाच्या निधनानंतर ३० मे रोजी निधन झाले.
एकाच कुटुंबातील चार जणांचा कोरोनाने बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
...............
०१ रवींद्र भोसले
०१ प्रभाकर भोसले
०१ राधिका भोसले
०१ रणजित भोसले