आप्पासाहेब पाटील
सोलापूर - इंधन दरवाढीने सर्वसामान्य लोक, नोकरदार तर गॅस दरवाढीने प्रत्येक कुटुंबियांचे बजेट कोलमडले आहे. मागील काही महिन्यांपासून दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. मागील चार महिन्यांत पेट्रोल ७ रूपये, डिझेल ८ रूपये तर घरगुती गॅस १२५ रूपयांनी महागले आहे. फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर ३ रूपयांची महागले आहेत. त्यामुळे सोलापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर ९४.११ तर डिझेलचा दर प्रतिलिटर ८३.३७ रूपये इतका झाला आहे.
जागतिक कमॉडिटी बाजारात तेलाच्या किमतींनी ६० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. लंडन क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल ०.७७ डॉलरने वाढला असून तो ५८.२२ डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव १.२२ डॉलरने वधारला आणि ६०.५६ डॉलर झाला आहे.
कंपन्यांनी यापूर्वी सलग तीन दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलचा दर ८७.८७ एवढा होता. डिसेंबर महिन्यात पेट्रोलचा दर ८९.१६ रूपये प्रति लिटर झाला. नव्या वर्षात पेट्रोलचा दर९०.९२झाला त्यानंतर तीन रूपयांनी तो वाढून फेब्रुवारी महिन्यात ताे ९३ रूपये ३१ पैसे झाला आहे. एकीकडे कोरोनामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक नियोजन कोलमडलेले असताना दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
---------------
दरवेळेस सिलेंडर खरेदी करताना भाव वाढलेलाच असतो. कधीही अन् कितीही भाव वाढ होत आहे. यावर कोणीच बोलायला तयार नाही. का भाव केले असे विचारायला गेल्यावर सरकारला विचारा असे उत्तर देतात. सरकार कोणाचेही असो आम्हाला काही देणं घेणं नाही. महागाई कमी झाली पाहिजे, गॅस, जीवनाश्यक वस्तूचे दर कमी झाले पाहिजे.
- सोनाली जगताप, सोलापूर
प्रत्येक दिवसाला पेट्रोल अन् डिझेलच्या किंमतीत वाढच पाहायला मिळत आहे. पेट्रोल दरवाढीचा फटका सर्वाधिक नोकरदारांना बसत आहे.दररोज कामाला जा-ये करण्यासाठी दुचाकीचा वापर मोठया प्रमाणात होतो. डिझेलच्या किंमतीही वाढल्या आहेत. महागाई कमी करण्यासाठी देवाने सरकारला बुध्दी द्यावी हीच मागणी आहे.
- सुरेश जाधव, सोलापूर
--------------
कोरोना, लॉकडाऊन, महागाई, अतिवृष्टी असे एक ना अनेक संकटे सर्वसामान्यांच्या जीवनात मागील वर्षभरापासून येत आहेत. त्यात सर्वाधिक झळ ही पेट्रोल, डिझेल अन् गॅसच्या किंमतीत झालेली वाढीची. एकीकडे कसेबसे जीवन जगत असलेल्या सर्वसामान्यांना महागाईने चांगलेच घेरले आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारने काहीतरी प्रयत्न करायला हवेत.
- सागर राऊत, सोलापूर