टेंभुर्णी : परमीट रूम व बारचा परवाना मिळवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आवश्यक असलेले दाखले बनावट सह्या करून बोगस दाखले जोडणारे टेंभुर्णीतील चार परमीट रूम व बारचे परवाने जिल्हाधिकारी यांनी कायमस्वरूपी रद्द केले आहेत. याबाबतची रिपाइं (ए)चे जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ यांनी तक्रार केली होती.
चारही हॉटेलचे परमीट रूम व बार चालू करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आवश्यक दाखले, पोलीस विभागाकडील चारित्र्य पडताळणी अहवाल, ग्रामपंचायतीचे बांधकाम पूर्णत्वाचे दाखले व राज्य उत्पादन शुल्क विभाग या सर्वांनी दिलेल्या अनुकूल चौकशी अहवालानुसार ५ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत पुरावे देण्यात आले होते.
याबाबत रिपाइंचे जिल्हाध्यक्ष जयंत पोळ यांनी ९ ऑगस्ट व २६ डिसेंबर २०१९ रोजी, १६ मार्च २०२० व १७ जानेवारी, २५ जानेवारी, ११ फेब्रुवारी व ४ मार्च २०२१ रोजी असे सहा वेळा तक्रार अर्ज दिले होते. या हॉटेल चालकांनी परमीट रूम व बारचे परवाने मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व दाखले बनावट सह्या करून खोटी कागदपत्रे बनवून घेतल्याचे म्हटले होते.
जयवंत पोळ यांच्या तक्रारीची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. गट विकास अधिकारी, पंचायत समिती कुर्डूवाडी यांच्या मार्फत कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या दाखल्यांची पडताळणी केली. बांधकाम परवाना, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व प्रस्तावित जागा गावठाण हद्दीत येत असल्याचा दाखला आदी दाखले सिद्ध होत नसल्याबद्दल प्रतिकूल अहवाल १५ मे २०२१ रोजी पाठवला होता.
गट विकास अधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी यांच्या अहवालानुसार तक्रारदार जयवंत पोळ यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने व हॉटेल चालकांनी केलेली हातचलाखी उघड झाली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दि.२ जुलै २०२१ रोजी वरील चारही हॉटेलचे परमीट रूम व बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.
----
परवाना रद्द झालेले बार अन् परमीट रूम
कल्पना चांगदेव डोईफोडे यांचे हॉटेल तृप्ती, सुवर्णसरिता धनंजय ढवळे यांचे हॉटेल श्री, गोपीनाथ धनाजी गरड यांचे हॉटेल विश्वजीत व अर्चना दत्तात्रय ढवळे यांचे हॉटेल विश्वजीत या चार परमिट रूम व बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. यातील हॉटेल तृप्ती, हॉटेल श्री, हॉटेल विश्वजित या परमीट रूमला ५ ऑगस्ट २०१९ रोजी तर गोपीनाथ गरड यांच्या हॉटेल विश्वजितला ८ एप्रिल २०१९ रोजी परवाना देण्यात आला होता.