करमाळा : करमाळा व माढा तालुक्यात ३३ केव्ही क्षमतेची चार वीज उपकेंद्रे मंजूर करण्यात आल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीमधून करमाळा तालुक्यासाठी उच्च दाब प्रणालीअंतर्गत चार उपकेंद्रे मंजूर करण्यात आली. यामध्ये कात्रज, दहीगाव, दहीवली, म्हैसगाव अशी चार उपकेंद्रे मंजूर झाली. यामुळे तालुक्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पुणे येथील विधान भवन येथे शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
करमाळ्यातील पुनर्वसन, भूसंपादनासंदर्भात
सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा मतदासंघातील पुनर्वसन, सिंचन, भूसंपादन मोबदला, दहीगाव-कुकडी-सीना कोळेगाव प्रकल्पग्रस्तांना संपादित जमिनीचा मोबदला, उजनी प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप, उजनी-सोलापूर या व अन्य प्रश्नांसंदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. हे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याची माहिती संजयमामा शिंदे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या बैठकीस भीमा कालवा मंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता, तसेच पुनर्वसन व भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी कुर्डूवाडी, दहीगाव उपसा सिंचन-सीना कोळेगाव प्रकल्प व कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आदी सर्व अधिकारी वर्ग माहितीसह उपलब्ध राहणार असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.