सोलापूर : अैवधरित्या वृक्षतोड करुन लाकूड भरुन निघालेली चार वाहने वनविभागाच्या पथकाने बुधवारी रात्री मुळेगावसह विविध भागात पकडली. कारवाईहीसाठी ही वाहने कार्यालयाच्या आवारात आणून लावली आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी नितकेतन जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत जवळपास ३५ हजार रुपयांचे लाकूड जप्त करण्यात आले आहे.
शहराबाहेरुन मोठ्याप्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड करुन ती बाजारात विकली जात असल्याची माहिती जाधव यांच्या पथकाला मिळाली होती. त्यांनी बुधवारी सायंकाळी मुळेगावजळव सापळा लावला. रात्री ७ वाजण्याच्या सुमारास कडुलिंबाचे लाकूड घेवून निघालेले वाहन पकडले. याबरोबरच लिंबीचिंचोळी, अक्कलकोट नाका, बार्शी रोड आणि मुळेगाव रोडवरही वाहने पकडली. उपवनसंरक्षक संजय माळी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कामगिरी बजावली़ या कामगिरीत वनपाल शीला बडे, चेतन नलावडे, वनिता इंगोले, अनिता शिंदे, बापू भोई, शुभांगी कोरे आणि कृष्णा निरवणे यांनी सहभाग नोंदवला.