दिनकर श्रीमंत माने (रा. जुजारपूर रोड-जुनोनी, ता. सांगोला), राहुल माने, ऋषी बंडगर, जीवन शेळके (रा. जुनोनी) अशी जखमींची नावे आहेत.
जुनोनी येथील दिनकर श्रीमंत माने, राहुल माने, त्यांचा मित्र जीवन शेळके, ऋषी बंडगर, विशाल व्हनमाने, महेश ठोंबरे हे रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास जुनोनी येथील हाॅटेल राया येथे जेवण करीत होते. खारवटवाडी-सांगोला येथील सुभाष सुरवसे याच्या सांगण्यावरून उमेश तायाप्पा कोळेकर याने जीवन शेळके व ऋषी बंडगर यांना दुपारी ३.३० च्या सुमारास बोलावून घेऊन दिनकर माने याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून मारहाण केली.
त्यानंतर दुपारी ४.१५ च्या सुमारास हॉटेल राया येथे त्याचे साथीदार बिरू कोळेकर, धनाजी कोळेकर, दत्ता हजारे, बंडू थोरात (रा. आरेवाडी) व संदेश पाटील (रा. अलकुड, ता. कवठेमहांकाळ), स्वप्निल कळकुंडे (रा. सांगोला) यांनी इनोव्हा कार एमएच १०/ बीझेड २१११ व एमएच ०१/ एव्ही ७२०७ मधून येऊन उमेश कोळेकर यांनी दिनकर माने यांना माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करतो काय, तुला व तुझ्या भावाला जिवंत सोडत नाही, असे म्हणून त्या सर्वांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी, उमेश कोळेकर याने वीट व बिरू कोळेकर याने दगडाने मारहाण करून फरफटत ओढून नेले व तुम्हाला आता मारून टाकतो अशी धमकी दिली.
यानंतर जबरदस्तीने कारमध्ये बसवून दुसऱ्या कारसह त्यांना रायावाडी, आरेवाडी व ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे रेल्वेपुलाच्या शेजारील आडरानात नेऊन दिनकर माने व साक्षीदारास चाकू दाखवत भोसकून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच जीवन शेळके यांच्या कारच्या (एमएच १०/ एम ४८२) काचा फोडल्या. याबाबत दिनकर श्रीमंत माने याने आठजणांविरुद्ध फिर्याद दिली. तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत.