सोलापूर : शहर व जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी केल्याप्रकरणी चार चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांकडून ७ लाख ५० हजार रुपये किमतीच्या एकूण १९ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या विविध हद्दीत मिळून २०१८ मध्ये ४६६ व जानेवारी २०१९ अखेर ६५ दुचाकी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. मोटरसायकल चोरीची उकल होण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांना विशेष पथक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत, त्यांचे गोपनीय बातमीदाराकरवी बातमी मिळाली होती की, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामदेव बबन चुनाडे (रा. अनिल नगर, पंढरपूर) हा सध्या जेलमधून बाहेर आला आहे. तो मोटरसायकलींची चोरी करीत आहे. यावरून गेल्या एक महिन्यापासून पंढरपूर येथील घरावर वॉच ठेवण्यात येत होता. गुन्हेगार हा मंगळवेढा येथे चोरी केलेली मोटरसायकल पंढरपूर बायपास रोडवरील रणजित पवार यास विक्री करण्यासाठी येणार असून, तो बायपास रोडवरील टोलनाक्याजवळ थांबल्याची माहिती मिळाली.
पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांनी मंगळवेढा येथे पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे, पोलीस हवालदार महंमद इसाक मुजावर, नारायण गोलेकर, गोरक्षनाथ गांगुर्डे यांना बातमी दिली. माहितीप्रमाणे पथक टोलनाक्याच्या ठिकाणी गेले. तेथे एक संशयित इसम हीरो स्प्लेंडर प्रो या दुचाकी मोटरसायकलवर संशयितरित्या थांबलेला दिसला. अधिकारी व कर्मचाºयांनी त्याला पकडले. त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने मोटरसायकल तीन महिन्यांपूर्वी अकलूज भागातून चोरून आणली, असे सांगितले.
अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव नामदेव बबन चुनाडे ( वय ४४, रा. अनिल नगर, पंढरपूर) असे सांगितले. त्याने मागील काही महिन्यांपासून सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून रात्रीच्या वेळी मोटरसायकली चोरल्याचे सांगितले. चोरलेल्या मोटरसायकली तो ऋषीकेश विनोद वाडेकर ( रा. अनिल नगर, पंढरपूर), रंजित सौदागर पवार (रा. रहाटेवाडी, मंगळवेढा), भाग्योदय उर्फ बबलू दामोदर काळुखे (रा. मंगळवेढा) यांच्या मार्फत विक्री करीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिन्ही आरोपींचा मंगळवेढा परिसरात शोध घेऊन ताब्यात घेतले.
नामदेव चुनाडे याच्यावर ३१ गुन्हे...- चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या नामदेव बबन चुनाडे ( वय ४४, रा. अनिल नगर, पंढरपूर) याच्याविरुद्ध सोलापूर ग्रामीण, सांगली, सातारा, पुणे शहर आयुक्तालय, पुणे ग्रामीण, सोलापूर शहर, आयुक्तालय व अहमदनगर या ठिकाणी यापूर्वी चोरी व घरफोडी असे एकूण ३१ गुन्हे दाखल आहेत.