सोलापूर : तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथील शेतात चंदन चोरणाºया कामगारांकडे ठेवण्यात आलेल्या चोरीच्या १४ तर अन्य ठिकाणी सहा अशा एकूण २० मोटरसायकली सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या वतीने जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांकडून ६ लाख १0 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आशिष ऊर्फ लाला हुकूमचंद शर्मा (वय २७, रा. ४४३, पश्चिम मंगळवार पेठ, चाटी गल्ली), विनायक ऊर्फ बाबू चंद्रकांत खैरमोडे (वय ३५), सागर बसवराज कपाळे (वय २८ रा. जंगम वस्ती, अक्कलकोट) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शहरातील मोटरसायकल चोरीचा तपास करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे व अजित कुंभार यांना चोरीच्या मोटरसायकली विकण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून २४ डिसेंबर रोजी कन्ना चौकातील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरसमोर सापळा रचण्यात आला. तेथे नंबर प्लेट नसलेली मोटरसायकल घेऊन एक इसम आला. पोलिसांनी त्याला गराडा घालून नाव विचारले असता त्याने आशिष ऊर्फ लाला हुकूमचंद शर्मा असल्याचे सांगितले. त्याच्या जवळची मोटरसायकल विनायक ऊर्फ बाबू चंद्रकांत खैरमोडे याने विकण्यासाठी दिल्याचे कबूल केले.
विनायक खैरमोडे याने आणखी १४ मोटरसायकली शर्मा याच्या जोडीदाराकडे असल्याचे सांगितले. या मोटरसायकली इटकळ परिसरात चंदन चोरी करणाºया कामगारांकडे असल्याची माहिती दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोध घेत इटकळमधील चंदनचोर कामगारांसाठी तात्पुरत्या स्वरुपात पाली (तंबू) मारलेल्या ठिकाणी धाड टाकली असता, तेथे १४ मोटरसायकली मिळून आल्या. या मोटरसायकलींचा वापर चंदन चोरीसाठी केला जात होता असे पोलिसांना सांगण्यात आले. सागर कपाळे याच्या शेतात पाच मोटरसायकली असल्याची माहिती मिळाल्याने त्याही जप्त करण्यात आल्या.
या मोटरसायकली शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत व मोहोळ, हडपसर, पुणे, गुलबर्गा (कर्नाटक) आदी ठिकाणाहून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) बाबूसाहेब बांगर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, अजित कुंभार, सहायक फौजदार दगडू राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय बायस, दिलीप नागटिळक, पोलीस नाईक राकेश पाटील, जयसिंग भोई, संतोष फुटाणे, पोलीस कॉन्स्टेबल वसंत माने, स्वप्नील कसगावडे, सोमनाथ सुरवसे, सागर गुंड, उमेश सावंत, चालक राजु राठोड, संजय काकडे, निंबाळकर यांनी पार पाडली.
फिर्यादींनी संपर्क साधावा- शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने गुन्हे शाखेला गुन्ह्याचा शोध लावण्याचे आदेश देण्यात आले होते. तपासामध्ये शहर जिल्ह्यास पुणे, गुलबर्गा येथुनही चोरण्यात आलेल्या मोटारसायकली मिळून आल्या आहेत. ज्यांची मोटारसायकल चोरीला गेली आहे, त्यांनी गुन्हे शाखेशी संपर्क साधून शाहनीशा करावी, असे आवाहन करीत आरोपींकडून आणखी मोटारसायकली मिळतात का याचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) बाबूसाहेब बांगर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील उपस्थित होते.