सोलापूर : रयत शिक्षण संस्थेत शिक्षकाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ११ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्याच्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार एप्रिल २०१५ मध्ये घडला. तीन वर्षे नोकरी लावण्याची प्रतीक्षा केल्यानंतर यासंदर्भात नागनाथ सुभाष क्षीरसागर (वय ५८, रा. शिवाजीनगर बाळे) यांनी ६ सप्टेंबर रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या प्रकरणी किशोर तानाजी चव्हाण, त्याची पत्नी अर्चना किशोर चव्हाण (रा. कात्रज, पुणे) या दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. काही वर्षांपूर्वी फिर्यादी नागनाथ यांची किशोर चव्हाण याच्याशी भारती विद्यापीठात ओळख झाली होती. त्यानंतर त्या ओळखीचे मैत्रीमध्ये रूपांतर झाले.
एप्रिल २०१५ मध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक आणि क्लार्क या पदाची भरती निघाली आहे. जर कोणी डी.एड.ची पदविका प्राप्त केलेले मुले असल्यास सांगा, त्यांच्या नोकरीचे काम करतो, असे किशोरने फिर्यादीस सांगितले. फिर्यादीने त्यांचा भाऊ गोरखनाथ क्षीरसागर, पुतणी पूजा यशवंत हे दोघे डी. एड. शिक्षण झालेले होते. त्यांना नोकरी लावण्याचे नागनाथ यांनी किशोरला सांगितले.
टप्प्याटप्प्यात दिली होती रक्कम- फिर्यादी नागनाथ यांनी भाऊ आणि पुतणीचे प्रत्येकी अडीच लाख रुपयांप्रमाणे पाच लाख रुपये हे आरोपीस चेक आणि आरटीजीएसद्वारे त्याच्या बँक खात्यावर भरले. सूरज धोत्रे, सत्तू भोसले या दोघांनी प्रत्येकी अडीच लाख रुपयांप्रमाणे पाच लाख आरोपीच्या बँक खात्यावर जमा केले. अनिता चव्हाण यांनी दीड लाख रुपये आरोपी किशोरला रोख स्वरुपात दिले. तर ३५ हजार रुपये हे अर्चना चव्हाण हिच्या बँक खात्यावर जमा केले. आरोपीने फिर्यादीस नोकरीचे काम होत नाही, पुणे येथील प्लॉट विकून पैसे परत देतो, असे सांगितले. मात्र पैसे परत न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.