सोलापूर : तुरीला बाजारभावापेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखवून १ काेटी ५६ लाख ९१ हजार २०४ रुपयांची १८११.४ क्विटंल तूर घेऊन निघून गेला. याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात संबंधित दलालाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज अरुण धरणे (वय ४३, रा. योगीनाथ हौसिंग सोसायटी, शेळगी, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमनाथ परमेश्वर चरे (वय ३८, रा. ककैय्या नगर, चौडेश्वर पतसंस्था शेजारी, शेळगी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जुलै २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत अरुण धरणे यांच्याकडून ३५५.४० क्विंटल, साई श्रध्दा ट्रेडर्सकडून ४३५.९० क्विंटल, सण ट्रेडर्सकडून ४३५.९० क्विंटल, फुलचंद जोशी ट्रेडर्सकडून ३०२.३५ क्विंटल, समर्थ ट्रेडर्सकडून ६८.८० क्विंटल, सानवी ट्रेडर्सकडून १९२.९५ क्विंटल, प्रणव ट्रेडर्सकडून १२०.२० क्विंटल या सात व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन तूर धान्यास बाजारभावापेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखविले.
या अमिषाला बळी पडून व्यापाऱ्यांनी आपल्याकडील १ कोटी ५६ लाख ९१ हजार २०४ रुपयांची तूर विक्री केली. मात्र सोमनाथ चरे याने खरेदी केलेल्या तुरीचे पैसे व्यापाऱ्यांना परत न करता स्वत: फोन करून शहरातून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून अधिकचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बहिरट हे करीत आहेत.