फिर्यादीत म्हटले की, माझ्या पत्नीला गर्भाशयाचा कॅन्सर झाला. तिच्यावर एका आयुर्वेदिक कंपनीत उपचार केल्यास तो बरा होत असल्याचे समजले. त्यानुसार गुगल लिंकवरून त्या कंपनीचे पेज सर्च केले. त्या ठिकाणी डॉ. सुनील गुप्ता याचा मोबाईल नंबर मिळाला. त्याच्याशी संपर्क केल्यानंतर त्याने ३० दिवसांसाठी १ लाख २० हजार रुपये भरण्यास सांगितले. ते त्या आयुर्वेद कंपनीच्या नावाने पाठविले. त्यानंतर पुन्हा हे शिबिर ४५ दिवसांचे असल्याने १५ दिवसांचे ६० हजार रूपये पाठविण्यास सांगितले. तेही पैसे पाठविले व त्यानंतर डॉक्टराच्या तपासणीचे ३० हजार रुपये मागितले तेही पाठविले. त्यानंतर नियुक्ती पत्र मिळाले; परंतु त्या आयुर्वेद कंपनीत कोणतीही नोंदणी नव्हती व आमचे पैसे जमा झाले नव्हते. यावरून डॉ. सुनील गुप्ता याने २ लाख १० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
कॅन्सरवर उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टराकडून २ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 4:20 AM