मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावळेश्वर येथील गंगा ज्वेलर्सचे मालक मारुती रेवणकर यांना गावातीलच दोघांनी बनावट सोन्याच्या साखळ्या देऊन ६ लाख १०हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात २६ जानेवारी रोजी इस्माईल इन्नुस मणियार याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने टोळीचा प्रमुख सूत्रधार पिसेवाडी ता. आटपाडी येथील मनोज मधुकर बनगरसह भुताष्टे ता. माढा येथून बळी आबा जाधव, दिल्लीच्या एजंटशी संपर्क असणाऱ्या योगेश श्रीगुरेलाल शर्मा, एजंट करगणी (ता.आटपाडी) येथील नवनाथ किसन सरगर या पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
या बनावट साखळ्यावर होलमार्क लावून फसवणूक करणाऱ्या एजंटाचे धागेदोरे पोलिसांना दिल्ली येथे असल्याचे तपासात निदर्शनास आले. त्यानंतर तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, कॉन्स्टेबल प्रवीण साठे, शरद डावरे यांचे पथक २ फेब्रुवारी रोजी दिल्लीला रवाना झाले. पथक दिल्लीत आल्याची कुणकुण लागताच उत्तर प्रदेशमध्ये हापुड या गावामध्ये या सोनसाखळी यांना हॉल मार्क लावणारा गौरव संजय अग्रवाल (वय,३१) याने दिल्लीतून धूम ठोकत मेरठ गाठले, परंतु पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता दिल्लीच्या चांदणी चौकातून साईनाथ कुरियरच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सांगली, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई या पाच जिल्ह्यात कुरियरच्या माध्यमातून सोनसाखळ्या पाठवणारा अंकुर अशोक गोयल (वय२५, रा. हापूड, उत्तर प्रदेश)) या दोघांना ताब्यात घेऊन मोहोळ पोलीस स्टेशनला आणले.
अशा बनत बनावट साखळ्या
गौरव संजय अग्रवाल हा सोन्याच्या ओरिजनल हॉल मार्क असणाऱ्या केवळ कड्या मागवायचा व सोन्याच्या साखळीचा मुलामा असणाऱ्या बनावट साखळ्या त्या हॉलमार्कच्या कडीला जोडून अशा बनावट साखळ्या महाराट्रासह अनेक राज्यात एजंटामार्फत कुरिअरद्वारे पाठवून बँका पतसंस्था व सोनारांची फसवणूक करण्याचा हा गोरखधंदा अखेर उघडकीस आला. या दोघांना ७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे हे करीत आहेत.