दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे माजी व्यवस्थापकीय संचालक व ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जाधव यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ३१ जानेवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. यावेळी श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगलीच्या सहकार्याने मोफत नेत्र चिकित्सा करण्यात आली.
डॉ. रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हाडांचे विकार, मानदुखी, कंबरदुखी, डॉ. स्वप्निल भोसले, डॉ. धनश्री ढोपे यांनी मोफत दंतचिकित्सा व औषधोपचार केले. यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी माळी शुगरचे उपाध्यक्ष परेश राऊत, महात्मा फुले पतसंस्थेचे उपाध्यक्ष महादेव एकतपुरे, माळी समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस प्रशांत एकतपुरे उपस्थित होते. यासाठी दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, महात्मा फुले पतसंस्था माळीनगर यांचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.