अशोक कांबळे
मोहोळ : शासनाच्या वतीने घरकूल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा शासनाचा निर्णय झालाय. त्यामुळे लाभार्थी आनंदले.. पण कशाचे काय? प्रशासनाने जे वाळू उपशासाठी ठिकाण दिले आहे तेथे वाळू कमी चिखलच जास्त आहे. वाळू उचलण्याची मुदत २५ जुलैपर्यंतच असल्याने ३ दिवसात वाळू कोठून आणायची असा प्रश्न लाभार्थ्यांपुढे पडला आहे. दरम्यान, या प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे ठिकाण बदलून देण्याची मागणी केली आहे.
राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध घरकूल योजनेतून मोहोळ तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. केवळ वाळूअभावी या घरकुलाचे काम आतापर्यंत रेंगाळले होते. दरम्यान, शासनाने घरकुलासाठी पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी मुळात वेळ झाला. आता अंमलबजावणी झाल्यानंतरही प्रशासनाकडून वाळू उपसा करण्यासाठी बेगमपूर, अरबळीच्या दरम्यान ज्या ठिकाणी वाळू नाही असे ठिकाण दिले आहे.
घरकूल लाभार्थ्यांना त्या ठिकाणी जाता येत नाही आणि त्या ठिकाणी वाळूऐवजी वाळूचा चाळ आणि सर्व गाळ हाताला लागत आहे. त्या ठिकाणचा रस्ताही चिखलाचा आहे, असे लाभार्र्थींचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने मंजूर केलेल्या योजनेचा लाभही लाभार्थ्यांना घेता येईनासा झाला आहे. या प्रकाराबद्दल शिवसेनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेऊन शिष्टमंडळाद्वारे तहसीलदार बनसोडे यांना निवेदन देऊन तातडीने वाळू उपसा करण्याचे ठिकाण बदलून मिळावे अशी मागणी केली आहे.
यावेळी तालुकाप्रमुख अशोक भोसले, तालुका संघटक काकासाहेब देशमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख,उपजिल्हाप्रमुख दादा पवार, नागेश वनकळसे, दिलीप टेकाळे, संतोष चव्हाण, तात्या धावणे, केशव वाघचवरे, बाळासाहेब वाघमोडे, शहाजी मिसाळ, शिवाजी पासले, सचिन सुरवसे, दीपक सिरसट, बापू वाघमोडे, जमीर मुजावर, दत्तात्रय देवकते, शाहीर काळे, नाना हावळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
ठरवून दिलेल्या ठिकाणची वाळू चोरीला- या प्रश्नासंबंधी भारतीय जनता पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे मोहोळ येथे आले असता भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश काळे यांनी तालुक्यातील विविध प्रश्नाचे निवेदन दिले होते. त्यावेळीही त्यांना घरकूल लाभार्थ्यांना शासकीय धोरणानुसार मोफत पाच ब्रास वाळू देण्यासाठी सूचित केलेल्या ठिकाणची वाळू चोरीला गेल्याने व तेथे वाळूच नसल्याचे स्पष्ट केले होते. दुसºया स्थळावरील वाळू उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे.
घरकूल धारकांना देण्यात आलेल्या पॉर्इंटवर वाळूचे प्रमाण कमीच आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे वाळूचा पॉर्इंट बदलून देण्याबाबत आम्ही नव्याने प्रस्ताव पाठवत आहोत. या बाबत वरिष्ठांनी निर्णय घेतल्यास वाळूचा दुसरा पॉर्इंट दिला जाईल.-जीवन बनसोड, तहसीलदार