अनेकांनी शेताकडे जाताना समूहाने जाणे पसंत केले आहे. जाताना हातात घंटी, बॅटरी घेऊन जाण्याची वेळ आली आहे. वनविभागाचे फिरते पथक मात्र दररोज या भागात गस्त घालत शेतकऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना देताना दिसत आहे .
१० महिन्यापूर्वी येथील सीताराम गुरव यांच्या वस्तीवर पहिल्यांदा बिबट्या आढळून आला होता. त्या दिवसापासून सुमारे तीन महिने मोहोळ,घाटणे , भोयरे, खरकटणे या परिसरामध्ये बिबट्याने दहशत माजवत अनेक जनावरांवर हल्ला केला होता. त्यानंतर ३ जून रोजी पहाटे गोरख जाधव यांच्या वस्तीवर हल्ला करीत एक रेडकू खाल्ले होते. त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतांश शेतकरी शेतात जातच नाहीत. जे जातात ते हातात काट्या घेऊन जात आहेत. ५ दिवसात बिबट्याने हल्ला केल्याची घटना आढळून आली नाही. बिबट्या अचानक शांत झालेला दिसत असला तरी सर्वत्र भीती जाणवत आहे.
-----
भोयरे येथील पवार वस्तीवर बिबट्यानं केलेल्या हल्ल्यानंतर वनविभागाच्या माध्यमातून या परिसरात दररोज गस्त चालू आहे. बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र व नदीकाठचा भाग आहे. त्याला लागणारे खाद्य उसात मिळत असेल तर बाहेर दिसणार नाही. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत:ची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे.
- सचिन कांबळे, वनरक्षक
----
बिबट्यानं म्हशीचे रेडकू खाल्लेल्या दिवसापासून आम्ही शेतात जाणेच बंद केले आहे. शेतात ऊस लावलेला असून, दारे धरायला जाण्याची सुद्धा आमची आता हिंमत होत नाही. वस्तीवरील सर्व जनावरे घरासमोर बांधून आम्ही काळजी घेत आहोत.
- सुधीर जाधव भोयरे
----
मागच्या वर्षी आमच्या वस्तीसमोर बिबट्या आढळून आला होता. वस्तीला चिटकूनच मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने मोटार चालू करण्यासाठी जाताना समूहाने जात आहोत. सोबत मोठा फोकस असणाऱ्या लाईटचा आधार घ्यावा लागत आहे.
सीताराम गुरव,मोहोळ
----
गेल्यावर्षी आमच्या लाईटच्या डीपी जवळच बिबट्या जवळून पाहिल्याने अंगाचा थरकाप उडाला होता. वस्ती कशी गाठली हे मला कळले नव्हते. आता पुन्हा बिबट्या आल्याच्या भीतीने शेतात जाताना घंटा वाजवणे व सोबत घेऊन जाणे चालू आहे. वीज मंडळाने रात्रपाळीची लाईट व आठवड्यातून एकदा दिवस पाळी करावी.
- लक्ष्मण पाटील, स्टेशन रोड मोहोळ