दीपक दुपारगुडे, सोलापूर: परसबाग कुठे आहे?, असे विचारले तर मुख्याध्यापकांनी इथे भाजीपाला लावला होता असे सांगितले. विद्यार्थ्यांची पेपरवर प्रश्नाची उत्तरे चुकीची असुनही गुण दिलेले दिसले. अस्वच्छता व गुणवत्तेबाबत अनास्था दिसून आल्याने तीन शिक्षकांना निलंबनाचा इशारा देत विद्यार्थ्यांचे पेपर झेड. पी. सीईओ मनीषा आव्हाळे यांनी ताब्यात घेतले. अचानक भेटीत नान्नजची केंद्रशाळा नापास झाली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील मतदान केंद्र, शाळा खोल्या व परिसर शासकीय यंत्रणेने स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अनेक गावांत सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती व शासकीय कर्मचा-यांनी मतदान केंद्राची स्वच्छता केली. नान्नज हे उत्तर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असून येथे ७ मतदान केंद्र आहेत. येथे जिल्हा परिषदेची केंद्र शाळा आहे. शाळा परिसरात अस्वच्छता असलेल्या केंद्र शाळेला झेड.पी. सीईओ मनीषा आव्हाळे यांनी भेट दिली.
सीईओंनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तपासणी केली असता पेपरवर उत्तर चुकीचे लिहिले असताना गुण मात्र दिल्याचे दिसून आले. गावातील पदाधिकारी व कर्मचा-यांना आपल्या गावच्या शाळेत काय चालतयं हे दिसत होते. चुकीचे हे पेपर सीईओंनी सोबत घेतले. अनेक चुका आढळल्याने तीन शिक्षकांना निलंबनाचा इशारा देत सीईओ निघून आल्या.