सोलापूर - सोलापुरात पूर्वभागात साकारणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४ कोटी रूपयांचा निधी लवकरच दिला जाईल अशी घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरात केली.
राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी येथील नियोजन भवनात महापालिकेच्या विकास कामांसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी स्मारकाच्या निधीची घोषणा केली.
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापालिकेत ठराव मंजूर झाला आहे. पण महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याने स्मारक उभा राहण्यासाठी अडचण येत असल्याची कैफियत सोलापुरातील नगरसेवकांनी आजच्या बैठकीत मांडली. याची दखल घेत स्मारकाचे काम मार्गी लागण्यासाठी तातडीने ४ कोटी रूपयांचा निधी देण्यात येत असल्याचे ना. शिंदे यांनी सांगितले.
-----------------
गुंठेवारीचा निर्णय लवकरच...
सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागात गुंठेवारीचे अनेक प्रकरणे आहेत. या प्रकरणांना बांधकाम परवाना मिळत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. गुंठेवारी बांधकामासंदर्भात शासनाने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे लवकरच हा ्प्रश्न मार्गी लागला जाईल असे ना. शिंदे यांनी सांगितले. अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी येथील पर्यटनाबाबत काही सुविधांची मागणी करण्यात आली आहे. यासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेणार असल्याचे सांगितले.