सोलापूर : शहरात असलेल्या बुधवार पेठ परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह धोकादायक बनले आहे. दलित वस्तीमधील स्वच्छतागृहाच्या सुधारणेबाबतची वर्क ऑर्डर देऊन सुद्धा या स्वच्छतागृहासाठी मंजूर असलेला लाखो रूपयांचा निधी स्मार्ट सिटीकडे वळविल्याचा आरोप महापालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केला आहे.
बुधवार पेठ परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरातील प्लॉट नंबर १७ व १८ दलित वस्ती या भागामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह नव्याने बांधा म्हणून गेल्या ३ ते ४ वर्षापासून मागणी होत आहे. तसेच १४ व्या वित्त आयोग अंतर्गत प्रभाग क्र. ५ मधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर बुधवार पेठ प्लॉट नं.१७ मातंग वस्तीमध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी महापालिकेने वर्कऑर्डर दिली आहे. या वर्कऑर्डरनुसार इस्टिमेट रक्कम ३४ लाख ३१ हजार २२९ रू. इतकी असून टेंडर रक्कम २७ लाख ८५ हजार ८९ रूपये इतकी आहे.
तसेच प्रभाग क्रमांक. ५ मधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर बुधवार पेठ येथील प्लॉट नं. १८ साठे चाळ मध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठीही वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र स्वच्छतागृहाचा निधी स्मार्ट सिटीकडे वळविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्यांनी गटनेते चंदनशिवे यांना दिल्यानंतर चंदनशिवे यांनी महापालिकेवर आरोप केला आहे.