बाळकृष्ण दोड्डी सोलापूर : वारीच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. त्या प्रमाणात शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही. यापुढील काळात वारीच्या नियोजनासाठी प्रत्येक शासकीय विभागाने त्यांना आवश्यक असलेल्या निधीची मागणी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडे करावी. त्यांच्या मार्फत शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील, असे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सूचित केले.
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने पंढरपूर आपत्ती व्यवस्थापन ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. अपर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यशदाचे आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे माजी संचालक तथा सेवानिवृत्त कर्नल विश्वास सुपनेकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेलकंदे, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.