अतिवृष्टीनंतर शासनाने मदत जाहीर केली. हा मदतनिधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे शासनाने जाहीर केले; मात्र तो जमा झाला नाही. दिवाळीनंतर २ डिसेंबर रोजी हा निधी बँक खात्यावर जमा झाल्याचा मेसेज बघून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, परंतु त्यांचा आनंद हा औटघटकेचा ठरला. कारण ३ डिसेंबर रोजी मोबाईलवर पडलेल्या मेसेजने मात्र शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
खरिपात अतिवृष्टीने झालेल्या नुकासानीपोटी शासनाने पंचनामे करून मदत केली. रब्बी हंगामासाठी ही मदत उपयुक्त ठरणार हा ठोकताळा बांधून बळीराजा सुखावला. पण शासनाचे आदेश असतानाही बहुतांश शेतकऱ्यांचा मदतनिधी बँकांनी कर्जाच्या हप्त्यापोटी वजा करून घेतला आहे. तो मदतनिधी बँकांनी परत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.