मंद्रुप : बीएसएफमध्ये देेशसेवेत असलेल्या औज मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) येथील जवान रत्नाकर विठ्ठल हडपद यांचे हृदयविकाराने मंगळवारी निधन झाले. औज येथे शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
रत्नाकर हडपद हे गेल्या ११ वर्षांपासून सीमासुरक्षा बलात कार्यरत होते. दोन महिन्यांची सुटी काढून १ जानेवारीला ते गावाकडे आले होते. यापूर्वी त्यांनी पंजाब, ग्वाल्हेर, टाकळी येथे सेवा बजावली आहे. दीड वर्षापूर्वी त्यांची काश्मीर येथे बदली झाली होती.
रविवारी सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. शासनाच्यावतीने तहसीलदार उज्वला सोरटे, मंद्रुपचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, झेडपी सदस्य अमर पाटील, सरपंच सखुबाई बन्ने यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. टाकळी येथील बीएसएफ कॅम्पमध्येही जवानांनी आदरांजली वाहिली.
राहत्या घरापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
------
फोटो : ०३ रत्नाकर हडपद