याबाबत प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ असून, संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. बोहाळीत एक कोरोनाबाधित रुग्ण घरातच उपचार घेत होता. त्याला जास्त त्रास जाणवू लागल्याने सोमवारी सायंकाळी पंढरपूरला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. याची माहिती प्रशासनाला देऊन नियमानुसार अंत्यविधी करणे गरजेचे असताना कोणालाही कल्पना न देता कोरोना मयताच्या अंत्यविधीचे कोणतेही नियम न पाळता त्यांचा अंत्यविधी नातेवाईकांकडून उरकल्याची माहिती समोर आली. ही माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांनी प्रशासनाला दिली.
याबाबत गावातील पोलीस पाटीलही अनभिज्ञ असल्याचे समोर आले. शिवाय, या मयत रुग्णाच्या कुटुंबातील आणखी काही सदस्य पॉझिटिव्ह असून, घरातच राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंढरपूर तालुक्यामध्ये विधानसभा पोटनिवडणुकीनंतर कोरोनाचा झपाट्याने संसर्ग वाढत आहे. दररोज शेकडो रुग्ण सापडत आहेत, तर अनेक जण चाचण्या न करता घरातच असल्याचे समोर येत आहे. बोहाळीमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. ग्रामसमिती, आरोग्य विभागामार्फत चाचण्या घेण्यात येत आहेत. मात्र, तरीही असे रुग्ण घरातच कसे सापडतात, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
------
मयत रुग्ण चाचणीसाठी तयार नव्हता. आम्ही रविवारी जबरदस्तीने टेस्ट केली होती, त्यावेळी तो पॉझिटिव्ह आल्याचे समजले होते. त्यानंतर त्यांना कोविड रुग्णालयात जाण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र त्यांनी ऐकले नाही. त्यांच्या घरात आणखी पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तेही रुग्णालयात जात नाहीत. प्रशासनाला सहकार्य करीत नाहीत. मयत झाल्यानंतरही आम्हाला काहीही न सांगता नातेवाईकांनी अंत्यविधी केला आहे.
- मनोज माने,
पोलीस पाटील, बोहाळी
----
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पोलीस पाटील यांच्याकडून आवश्यक माहिती घेऊन पुढे संसर्ग होऊ नये, यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. मंगळवारी तो भाग सील करून नागरिकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. तहसीलदार सुशील बेल्हेकर म्हणाले, याबाबत आपल्याला काहीही कल्पनाच नाही. आरोग्य विभागाने कसलाच प्रतिसाद दिला नाही. आता या ठिकाणी संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासन काय भूमिका घेणार, कुणावर कार्यवाही करणार, याकडे लक्ष लागले आहे.